शेकडो युवकांची तहसीलवर धडक

क्रीडा संकुलाची दुरवस्था

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
चांदूरबाजार,
march-to-the-tehsil-office : तालुक्यातील एकमेव शासकीय क्रीडा संकुल कित्येक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असून त्याच्या दुरवस्थेविरोधात शुक्रवार, १७ जुलैला शेकडो युवकांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांमार्फत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन पाठविले. तातडीने विकासकामे हाती न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला.
 
 
jkl
 
 
 
ग्रामीण भागातील हजारो होतकरू खेळाडू, पोलिस व सैन्य भरतीची तयारी करणारे युवक-युवती, विविध शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी शारीरिक सराव करणारे विद्यार्थी तसेच नागरिक या क्रीडा संकुलाचा वापर करतात. मात्र, संकुलात आवश्यक सुविधा नसल्याने खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली. यापूर्वी २०२३ आणि २०२५ मध्येही युवकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदने दिली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी आहे. यावेळी तहसीलदारांमार्फत अमरावती जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात क्रीडा संकुलातील २०० मीटर धावपट्टी खराब झाल्याचे नमूद करून ती ४०० मीटरपर्यंत विकसित करण्याची मागणी केली आहे. मुलींसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय, पथदिवे, गोळाफेक व भालाफेकसाठी सुविधा आणि संकुलाची नियमित देखभाल करण्याचीही मागणी करण्यात आली.
 
 
 
क्रीडा संकुलालगत असलेला कचरा डेपो आणि मासेविक्री केंद्रामुळे परिसरात दुर्गंध व अस्वच्छता निर्माण होत असून खेळाडूंना सराव करताना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हे दोन्ही प्रकल्प तातडीने अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली. स्थानिक आमदार विकास निधी तसेच इतर उपलब्ध शासकीय निधीतून क्रीडा संकुलाचा सर्वांगीण विकास करावा, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
 
 
यावेळी सुपर व्हिजन अकॅडमीचे संचालक धीरज थोरात, शौर्य फिजिकल करिअर अकॅडमीचे संचालक तुषार गतफणे, जिजाऊ प्रशासकीय स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे मुख्य मार्गदर्शक राऊत, सहमार्गदर्शक शंकर पाळे, करण खंडारे, प्रतीक इंगळे, सागर ठेवले, अक्षय गवई, राहुल दामोदर आदी उपस्थित होते.