कॉन्ट्रॅक्ट किलर ठरणार साक्षीदार?

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
पुणे,
Ketan Aggarwal murder case लोहगड येथे घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. १६ जुलै रोजी वडगाव मावळ न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत हा आदेश देण्यात आला. या प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती समोर येत आहे.तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, केतन अग्रवालची हत्या करण्यापूर्वी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी एका कथित कॉन्ट्रॅक्ट किलरशी संपर्क साधल्याचा संशय आहे. दोघांनी त्याची प्रत्यक्ष भेट घेऊन केतनबाबत माहिती दिली होती. मात्र, केतनची माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीने ही सुपारी स्वीकारण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणांच्या मते, ही व्यक्ती आता या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार ठरू शकते. ज्या कॅफेमध्ये ही भेट झाल्याचा संशय आहे, तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त करून तपास सुरू ठेवला आहे.
 
siya
 
 
पोलिसांच्या तपासानुसार, केतन अग्रवालला ट्रेकिंगची आवड असल्यामुळे त्याला लोहगडावर नेणे सोपे जाईल, असा अंदाज सिया गोयलने बांधला होता. तसेच ज्या ठिकाणी घटना घडल्याचा संशय आहे, तेथे सीसीटीव्ही नसल्याची आणि पर्यटकांची वर्दळ कमी असल्याची माहिती तिने आधीच मिळवल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे.याशिवाय, चौकशीदरम्यान शांत कसे राहावे आणि पोलिसांच्या प्रश्नांना कशा प्रकारे उत्तर द्यावे, यासंदर्भातील जपानी भाषेतील काही व्हिडीओ सिया आणि चेतन यांनी पाहिल्याचा तपासात दावा करण्यात आला आहे. या व्हिडीओंच्या लिंक त्यांच्या वेब हिस्ट्रीमध्ये आढळल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. तपासादरम्यान पोलिसांना सिया आणि चेतन वारंवार भेट देत असलेल्या चार ते पाच हॉटेलांची माहितीही मिळाली आहे. त्यापैकी एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे एकत्र आत जाताना दिसत असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर काही वेळाने सिया बाहेर पडते, तर चेतन दुसऱ्या एका तरुणीसोबत त्याच हॉटेलमधील त्याच खोलीत जाताना दिसत असल्याचा दावा तपासाशी संबंधित सूत्रांनी केला आहे. या फुटेजची पडताळणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.