'ताटात नाही, मेहनतीत मिळालं'; मेस्सीचा संदेश!

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
lionel-messi : गतविजेत्या अर्जेंटिनाने इंग्लंडविरुद्धचा दुसरा उपांत्य सामना २-१ अशा फरकाने जिंकून फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने केवळ सात मिनिटांत दोन गोल केले. आता अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा सामना स्पेनशी होईल. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेदरम्यान, अर्जेंटिनावर पक्षपाती पंचगिरीचे आरोप झाले, ज्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली. अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर, अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने टीकाकारांना उत्तर देताना म्हटले की, त्यांना काहीही आयते मिळालेले नाही.
 
 

messi 
 
 
आमच्या संघात अंतिम क्षणी पुनरागमन करण्याची क्षमता आहे
 
स्पेनविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी जारी केलेल्या एका निवेदनात, अर्जेंटिना संघावर सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर लिओनेल मेस्सीने म्हटले की, त्यांच्या संघात अंतिम क्षणी पिछाडीवरून पुनरागमन करण्याची क्षमता आहे आणि त्यामुळेच त्यांना विजय मिळाला. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ८५ व्या मिनिटाला ०-१ ने पिछाडीवर पडल्यानंतर, अर्जेंटिनाने सात मिनिटांत दोन गोल करून २-१ ने विजय मिळवला आणि सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर मेस्सी म्हणाला, "तुम्हाला आवडो वा न आवडो, आणि तुम्ही काहीही म्हणा, गेल्या चार वर्षांतील ही आमची सर्वोत्तम कामगिरी आहे. आम्ही पुन्हा एकदा जगातील अव्वल दोन संघांमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. यावरून हे सिद्ध होते की आम्ही जे काही मिळवले आहे ते योगायोग नाही. आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही. सलग दोन विश्वचषक अंतिम फेऱ्यांमध्ये पोहोचण्याचा पराक्रम फार कमी संघांनी केला आहे, आणि आम्ही तो करून दाखवला आहे."
 
मेस्सीला पहिल्यांदाच गोल्डन बूट जिंकण्याची संधी
 
अर्जेंटिनाच्या अंतिम फेरीत प्रवेशामुळे, लिओनेल मेस्सीला पहिल्यांदाच गोल्डन बूट जिंकण्याची संधी मिळाली आहे. मेस्सी सध्या आठ गोल आणि चार असिस्टसह २०२६ फिफा विश्वचषकाच्या गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याला किलियन एम्बाप्पेकडून स्पर्धा आहे, जो फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात खेळणार आहे. मेस्सीने आपल्या कारकिर्दीत अद्याप गोल्डन बूट जिंकलेला नाही.