‘नगारा विरासत’ वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापनावरून महंत आक्रमक

२५ जुलैला ताला ठोको आंदोलनाचा इशारा

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
मानोरा, 
museum-management : बंजारा समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील ‘नगारा विरासत’ वस्तुसंग्रहालयाच्या व्यवस्थापनात निष्काळजीपणा आणि कर्मचार्‍यांच्या उद्धट वर्तणुकीच्या निषेधार्थ बंजारा समाजाने प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. महंत कबीरदास महाराज आणि महंत जितेंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना सादर केलेल्या निवेदनात नगरा विरासत वस्तुसंग्रहालयाचे व्यवस्थापन करणार्‍या ‘अल्फा कंपनी’चे टेंडर रद्द करून संपूर्ण कारभार जिल्हा प्रशासनाकडे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
 
nhjk
 
 
 
निवेदनात म्हटले आहे की, सध्या कार्यरत असणार्‍या कंपनीचे मॅनेजर आणि सुपरवायझर पोहरादेवीला दर्शनासाठी येणार्‍या श्रद्धाळू भाविक, महिला आणि पर्यटकांशी अत्यंत उद्धट आणि हीन दर्जाची भाषा वापरतात. पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होणारी ही गैरवर्तनूक संतापजनक असून ती खपवून घेतली जाणार नाही. ‘नगारा विरासत’चे तिकीट शुल्क १०० रुपये करण्यात याव, मुजोर ‘अल्फा कंपनी’ला हटवून व्यवस्थापन जिल्हा प्रशासनाने स्वतःकडे घ्यावे. येत्या २५ जुलै २०२६ पर्यंत या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर महंत कबिरदास महाराज, महंत जितेंद्र महाराज आणि हजारो आंदोलकांच्या उपस्थितीत नगारा विरासत वस्तुसंग्रहालयाला ताला ठोको आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
 
 
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वाशीम जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि संबंधित कंपनीची राहील. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या शासकीय वास्तूच्या पावित्र्यासाठी आणि भाविकांच्या सन्मानासाठी तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.