तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
bapu-daryapurkar : स्मार्ट मिटर लावण्याच्या नावाखाली नवीन शक्कल महावितरण कंपनी सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व ग्रामीण भागात राबवित आहे. ती म्हणजे तुमच्या येथील विद्युत मिटर फॉल्टी आहे ते चेक करायचे आहे. असे कारण दाखवून तुमच्या घरात घुसतात व तुमचे मीटर फॉल्टी असल्याचे सांगून अथवा वीज चोरी असल्याचे सांगून अथवा 5 हजार रुपये पेक्षा जास्त थकबाकी असल्यास त्या ग्राहकाकडे सुद्धा स्मार्ट मिटर लावत असल्याचा खुलासा पत्रपरिषदेत वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष बापू दर्यापूरकर यांनी केला.
यावेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी, राजीव जेकब उपस्थित होते. पुढे बोलताना दर्यापूरकर म्हणाले, कुठलीही सबब दाखवून जुने मिटर ताबडतोब बदलून त्या जागी स्मार्ट मिटर लावा, असा महावितरण मुंबई मुख्य कार्यालयाचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आदेश निघालेला असल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले आहे.
त्यामुळे सर्व वीज ग्राहकांनी खबरदारी घ्यावी तसेच वितरण कंपनीचे कुठलेही अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या घरात येऊ देऊ नये. 2003 कायदा कलम 55 अनुसार मिटर निवडीचा अधिकार हा ग्राहकांचा असतो. 163 (2) दोन नुसार वितरण कंपनीने आपल्या 24 तासाची लेखी सुचना दिल्याशिवाय आपल्या घरात त्यांना येता येत नाही, अस सांगितले.
आपण स्मार्ट विरोधात न्यायालयात गेलो आहो तरी नागरिकांना काही अडचणी आल्यास त्यांनी आमच्यासोबत संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.