महावितरणचा १५४ वीज चोरांना ‘झटका

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
वर्धा,
electricity-thieves : जिल्ह्यात वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेला जुलैच्या पहिल्याच पंधरवड्यात मोठे यश मिळाले आहे. महावितरणच्या वर्धा मंडळातर्फे राबविण्यात आलेली ही मोहीम वीज चोरी करणार्यांना झटका देणारी ठरली. महावितरणच्या अधिकार्यांनी १५ दिवसांत ९ हजार ६५४ ठिकाणी आकस्मिक भेट देत तब्बल १५४ ठिकाणच्या वीज चोरट्यांवर कारवाई केली.
 
 
 
j
 
 
महावितरणच्या अधिकार्यांसह कर्मचार्यांनी १ ते १५ जुलै या कालावधीत वीज चोरी पकड मोहीम राबविली. १५ दिवसांच्या काळात महावितरणच्या पथकांनी ९ हजार ६५४ ठिकाणांची प्रत्यक्ष तपासणी केली. या मोहिमेत १४८ प्रकरणांमध्ये वीज चोरी उघड झाली आहे तर ६ ठिकाणी अनधिकृत वीज वापराच्या घटना आढळून आल्या आहे. अशा प्रकारे १५४ ठिकाणी वीज चोरी किंवा अनधिकृत वीज वापराची प्रकरणे समोर आली आहे.
 
 
महावितरणने १९,८७१ युनिट्सची वीज चोरी उघड केली आहे. या चोरीमुळे महावितरणचे आर्थिक नुकसान झाले होते. ज्याची भरपाई करण्यासाठी ३.५८ लाख रुपयांचे देयक संबंधितांना आकारण्यात आले आहे. त्यापैकी २ लाख ९ हजार रुपयांची वसुली केली अशी माहिती महावितरणच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी यांनी सांगितले.