नाव दिल्ली,
Mahi's prediction proved correct २०२६ फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात रंगणार असून, या महासंग्रामापूर्वी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची तब्बल १० वर्षांपूर्वीची एक इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते या पोस्टला धोनीच्या भाकिताशी जोडत असून, त्याने २०१६ मध्येच या अंतिम सामन्याचा अंदाज व्यक्त केला होता, असा दावा केला जात आहे.स्पेन आणि अर्जेंटिना हे दोन्ही संघ १९६६ नंतर प्रथमच विश्वचषक स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत आणि यावेळी ही लढत थेट विजेतेपदासाठी होणार आहे. एका बाजूला लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील गतविजेता अर्जेंटिना असेल, तर दुसऱ्या बाजूला लॅमिन यामालच्या नेतृत्वाखाली दमदार बचावफळीच्या जोरावर अंतिम फेरी गाठणारा स्पेन असेल. स्पर्धेत स्पेनने आतापर्यंत केवळ एकच गोल स्वीकारला आहे.

स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यातील अंतिम सामना सोमवार, २० जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १२.३० वाजता खेळवला जाणार आहे. स्पेनने उपांत्य फेरीत फ्रान्सचा २-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली, तर अर्जेंटिनाने इंग्लंडवर मात करत विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला.अंतिम सामन्याची घोषणा होताच धोनीची २०१६ मधील पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर असताना धोनीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. त्या छायाचित्रात तो अक्षर पटेल, करुण नायर आणि जयदेव उनाडकट यांच्यासोबत फिफा व्हिडीओ गेम खेळताना दिसत होता. या पोस्टला त्याने"स्पेन विरुद्ध अर्जेंटिना"असे कॅप्शन दिले होते.
याच कॅप्शनमुळे ही पोस्ट पुन्हा व्हायरल झाली असून, धोनीच्या चाहत्यांनी त्याला 'भविष्याचा अचूक अंदाज लावणारा कर्णधार' असे संबोधत ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर शेअर केली आहे. अनेकांनी हा केवळ योगायोग असल्याचे म्हटले असले, तरी सोशल मीडियावर या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, अर्जेंटिना सलग दुसऱ्या विश्वचषक विजेतेपदाच्या प्रयत्नात आहे. ३९ वर्षीय लिओनेल मेस्सीच्या अनुभवावर अर्जेंटिनाची मोठी भिस्त आहे. दुसरीकडे, स्पेनची मजबूत बचावफळी आणि लॅमिन यामालसारखे युवा खेळाडू संघाची ताकद मानले जात आहेत. त्यामुळे यंदाचा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.