ईशान्य भारतात घुमणार बाप्पाचा गजर!

- मणिपूरमध्ये उभारणार हुबेहूब "सिद्धिविनायक मंदिर" - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
मुंबई,
eknath-shinde : मुंबईतील प्रभादेवी येथील ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर हे देशभरातील कोट्यवधी भाविकांचे अढळ श्रद्धास्थान आहे. आता हेच बाप्पाचे वैभव थेट ईशान्य भारतातही पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिराची एक भव्य प्रतिकृती लवकरच मणिपूर राज्यामध्ये उभारली जाईल, अशी मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
 
 
eknath-shinde
 
 
नवी दिल्लीतील 'महाराष्ट्र सदन' येथे आयोजित करण्यात आलेल्या 'ईशान सेतू - सांस्कृतिक एकात्मता व राष्ट्रनिर्माण' या विशेष सोहळ्यात ते बोलत होते.
 
महाराष्ट्र अन् ईशान्य भारताचा 'भावनिक सेतू'
 
या सोहळ्यात ईशान्य भारताविषयीच्या भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्र्यांनी काही सुंदर काव्यपंक्तीही सादर केल्या. ते म्हणाले, "महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने मणिपूरमध्ये उभारले जाणारे हे मंदिर केवळ एक वास्तू असणार नाही, तर ते महाराष्ट्र आणि ईशान्य भारत यांच्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक नात्याला जोडणारा एक मजबूत 'ईशान सेतू' ठरेल."
 
सांस्कृतिक पुनर्जागरणाचा ऐतिहासिक क्षण
 
हा कार्यक्रम केवळ एका ग्रंथाच्या प्रकाशनाचा नसून भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा एक ऐतिहासिक क्षण आहे, असे शिंदे यांनी नमूद केले. "आज महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून भारताचा आत्मा आणि संस्कृती देशाच्या हृदयातून थेट ईशान्य भारतापर्यंत पोहोचत आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे केवळ भौगोलिक अंतरच नाही, तर मनामनांतील अंतरही कायमचे संपुष्टात येत आहे. 'ईशान सेतू ट्रस्ट'ने सुरू केलेला हा प्रवास खऱ्या अर्थाने 'भारत जोडो' यात्रा आहे," असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
 
दिग्गजांची उपस्थिती
 
राष्ट्रीय समरसता आणि सांस्कृतिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याला परमपूज्य राष्ट्रऋषी स्वामी गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, स्वतंत्र देव सिंह, विविध राज्यांचे लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद तसेच देशातील प्रमुख मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.