अनिल कांबळे,
नागपूर,
prostitution-case : सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील छावणी चौकातील अचरज टॉवर इमारतीमध्ये मसाज-स्पा सेंटरच्या नावावर चक्क देहव्यापाराचा अड्डा सुरु होता. येथे गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ ने छापा टाकून देहव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन तरुणींची सुटका करण्यात आली असून, स्पा चालकाला अटक करण्यात आली आहे. भूषण नरेशराव वाघमारे (३१, अंबाझरी,अजयनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी गुरुवारी संध्याकाळी गस्तीवर असताना त्यांना छावणी चौकातील अचरज टॉवरच्या तळमजल्यावर असलेल्या ‘रेडियंट सलून अँड स्पा’मध्ये ग्राहकांना जागा उपलब्ध करून देऊन तरुणींकडून देहव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी भूषण वाघमारे हा ग्राहकांकडून पैसे घेऊन देहव्यवसाय करून घेताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन पीडित तरुणींची सुटका केली. तसेच आरोपीच्या ताब्यातून तीन हजार रुपयांची रोकड, मोबाईल, सीसीटीव्हीचा डीव्हीआर आणि इतर साहित्य असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भूषण वाघमारेविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पुढील कारवाईसाठी सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.