आर्वी,
parag-soman : आदर्श ग्रामपंचायत मिर्झापूर नेरी या गावाने रचलेला ग्राम विकासाचा पाया आणि येथील ग्रामस्थांनी जिद्द चिकाटी आत्मविश्वास आणि परिश्रमाच्या भरोशावर घेतलेली गरुड झेप इतर गावांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित ग्रामस्थांशी संवाद या कार्यक्रमात नेरी मिर्झापूर येथील भेटी दरम्यान ते ग्रामस्थांसोबत बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, जिपचे कार्यकारी अभियंता गुंडतवार, महिला बाल विकास अधिकारी मनीषा कुरसुंगे, आर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवशंकर इंगोले, उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, आर्वीचे तहसीलदार हरीश काळे, समाज कल्याण अधिकारी भागवतकर, मनरेगा विभागाच्या गटविकास अधिकारी शितल हिवराळे महावितरणचे गायकी, गटविकास अधिकारी धम्मदीप हुलके आदी उपस्थित होते.
पराग सोमण पुढे असेही म्हणाले की मिर्झापूर नेरी सारखी गावं एका रात्रीतून उभी होत नाही तर त्यासाठी सतत कार्यप्रवण असणार्या सरपंच बाळा सोनटक्के सारख्या खंबीर नेतृत्वाची आणि त्यांना सदैव साथ देणार्या ग्रामस्थांची मेहनत ग्राम विकासाचे मॉडेल उभे करत असतात असे ते म्हणाले.
तत्पूर्वी मिर्झापूर येथे दैनंदिन संपन्न होणारी सामुदायिक प्रार्थनेची वेळ आणि प्रशासकीय अधिकार्यांची कार्यक्रमाची वेळ एकच आल्यामुळे सर्व प्रशासकीय अधिकार्यांनी सामुदायिक प्रार्थनेत सहभागी झाले.
गावासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात उल्लेखनीय कार्य करणार्या ग्रामपंचायत अधिकारी संजय यावले, एस आय आरमध्ये विहित कालावधीत १०० टक्के काम पूर्ण करणारे सहाय्यक शिक्षक विवेक कहारे, पोलिस पाटील संजय विरुळकर, आदींचा विशेष सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांचे हस्ते करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या पुढे ग्राम विकासाच्या विविध प्रलंबित असणार्या समस्यांबाबत स्मिता काळपांडे, सुषमा कठाणे, बंटी कोल्हे, अंकुश तुमसकर सुदाकरराव चाफले, विलास काळपांडे सह गावकर्यांनी प्रश्नांचा भडीमार केला.
प्रशासकीय अधिकार्यांनी यशस्वी तोडगा काढून येणार्या अल्पावधीत सर्व समस्या निकाली काढण्याबाबत आश्वासन दिले. प्रास्ताविक सरपंच बाळा सोनटक्के यांनी केले. संचालन ग्रापं अधिकारी संजय यावले यांनी तर आभार मुख्याध्यापक मंगेश कोल्हे यांनी मानले.