मुंबई,
mystery man spotted with malaika अभिनेत्री मलायका अरोरा सध्या ग्रीसमधील सुट्टीमुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर ग्रीसमधील आपल्या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले असून, त्यातील एका छायाचित्रामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. समुद्रकिनारा, पारंपरिक ग्रीक वास्तू आणि सूर्यास्ताच्या नयनरम्य पार्श्वभूमीत टिपलेले हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये मलायकाने विविध स्टायलिश पोशाख परिधान केलेले दिसत आहेत. एका छायाचित्रात ती पारंपरिक ग्रीक शैलीतील घरात विश्रांती घेताना दिसते, तर दुसऱ्या फोटोमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील खडकांवर उभी राहून तिने फोटोशूट केले आहे. संध्याकाळच्या एका फोटोमध्ये तिने मरून रंगाचा हॉल्टर-नेक ड्रेस परिधान केला असून, तिचा हा लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
मात्र, सर्वाधिक चर्चा एका अशा फोटोची होत आहे, ज्यामध्ये मलायका एका अनोळखी व्यक्तीसोबत समुद्राच्या मध्यभागी उभी असल्याचे दिसते. दोघांचाही फोटो मागून टिपण्यात आला असल्याने त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे तो नेमका कोण आहे, याबाबत सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. काहींनी तो तिचा नवीन मित्र असल्याचा अंदाज व्यक्त केला, तर काहींनी त्याचे नाव हर्ष मेहता असल्याचा दावा केला. मात्र, या दाव्यांना कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
मलायकाने हे फोटो शेअर करताना, एअरबीएनबीसोबतच्या सहकार्याचा उल्लेख केला आहे. "माझ्या पद्धतीने अनुभवलेला सुंदर ग्रीक उन्हाळा" अशा आशयाचे कॅप्शन देत तिने ही पोस्ट शेअर केली. त्यासोबत "ग्रीस गेटवे", "समर एस्केप" आणि "हॉलिडे मूड" असे हॅशटॅगही वापरले आहेत. या पोस्टनंतर चाहत्यांनी तिच्या स्टाइल आणि फिटनेसचे भरभरून कौतुक केले.
दरम्यान, अर्जुन कपूर यांच्यासोबतचे नाते संपल्यानंतर मलायकाचे नाव उद्योगपती हर्ष मेहता यांच्याशी जोडले जात आहे. हर्ष मेहता हे हिऱ्यांचे व्यापारी असून, दोघे अनेकदा एकत्र दिसल्याने त्यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे ग्रीसमधील या व्हेकेशन फोटोंमधील व्यक्तीची ओळख अद्याप गूढच कायम आहे.