वाशीम,
outstanding-bills-for-agricultural-pumps : महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकर्यांच्या साडेसात (७.५) अश्वशक्ती पर्यंतच्या कृषिपंपांचे ४८ हजार कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल पूर्णपणे माफ करण्याची मोठी घोषणा केली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ६६ हजारावर शेतकर्यांना मिळणार आहे. त्यांच्याकडील १ हजार १२ कोटी ५२ लाखांची थकबाकी माफ होणार आहे.
साडेसात अश्वशक्ती (७.५ एचपी) क्षमतेपर्यंतच्या कृषिपंपांचे तब्बल ४८ हजार कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल सरकार पूर्णपणे माफ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ जुलै रोजी केली. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास साडेसात (७.५) अश्वशक्तीचे कृषिपंप वापरकर्त्या शेतकर्यांची वीज बिलाची जुनी सर्व थकबाकी माफ होऊन पाटी कोरी होणार आहे. या संदर्भातील अधिकृत निर्देश प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली. पावसाची अनिश्चितता आणि शेतीवरील वाढत्या खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे.
साडेसात अश्वशक्तीच्या कृषिपंपांचे सध्याचे वीज बिल सरकारने आधीच माफ केले आहे. मात्र, शेतकर्यांच्या नावावर जुनी थकीत बिले कागदोपत्री तशीच होती. यामुळे नवीन कनेशन घेताना किंवा इतर कामांत शेतकर्यांना अडचणी येत होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी राज्यातील शेतकर्यांचे तब्बल ४८ हजार कोटी रुपयांचे जुने थकीत वीज बिल सरकार पूर्णपणे माफ करणार आहे.
तालुकानिहाय शेतकरी
वाशीम तालुका १२ हजार ९४५, मानोरा तालुका ७ हजार ५८२, मंगरूळनाथ ९८९२, कारंजा तालुका १हजार २९८, रिसोड तालुका १३ हजार ०५७ तर मालेगाव तालुयातील १० हजार ३९५ शेतकर्यांचा समावेश आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे शेतकर्यामधून स्वागत होत आहे.