मुंबई
paresh rawal बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी ‘OMG 2’ या चित्रपटासंदर्भात केलेल्या ताज्या वक्तव्यांमुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. त्यांनी चित्रपटाच्या मूळ संकल्पनेपासून ते पटकथेतील बदलांपर्यंत अनेक दावे करत अक्षय कुमारवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगली आहे.
२०२३ मध्ये ‘OMG 2’ प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटाला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) मोठ्या वादाला सामोरे जावे लागले होते. धार्मिक विषय आणि लैंगिक शिक्षण यांचे मिश्रण केल्याबद्दल चित्रपटावर आक्षेप घेण्यात आले होते. काही काळ चित्रपटावर बंदी घालण्याचीही चर्चा होती. मात्र, काही बदल केल्यानंतर चित्रपटाला ‘A’ प्रमाणपत्र देण्यात आले आणि तो प्रदर्शित झाला. या प्रक्रियेत चित्रपटातील अनेक संवाद आणि काही शब्दांमध्येही बदल करण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर परेश रावल यांनी दावा केला आहे की, ‘OMG 2’ची मूळ कल्पना त्यांची होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, अक्षय कुमार यांनी त्यांच्याकडून ही पटकथा घेतली, मात्र त्यांना त्याचे श्रेय देण्यात आले नाही. तसेच, निर्मात्यांनी मूळ कथेनुसार चित्रपट तयार केला असता, तर त्याभोवती निर्माण झालेला बराचसा वाद टाळता आला असता, असेही त्यांनी म्हटले आहे.परेश रावल यांच्या दाव्यानुसार, त्यांनी सुचवलेली कथा वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित होती. त्या कथेत कोणत्याही दैवी हस्तक्षेपाचा समावेश नव्हता. मात्र, अक्षय कुमार या प्रकल्पाशी जोडले गेल्यानंतर पटकथेत अनेक मोठे बदल करण्यात आले. याच कारणामुळे आपण या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विकी लालवाणी यांना दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी सांगितले की, ‘OMG 2’ म्हणून प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची मूळ संकल्पना त्यांनीच मांडली होती. त्यांनी ही कल्पना दिग्दर्शक अमित राय यांच्यासोबत शेअर केली आणि त्यांच्यासोबत मिळून पटकथा विकसित केली. मात्र, अक्षय कुमार या प्रकल्पात सहभागी झाल्यानंतर कथेने वेगळे वळण घेतल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांच्या मते, मूळ कथेत देवाची कोणतीही भूमिका नव्हती.
याबाबत बोलताना परेश रावल म्हणाले, “मी ‘रोड टू संगम’चे दिग्दर्शक अमित राय यांच्याशी संपर्क साधला आणि विचारले की ते दुसरा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत का. मी त्यांचा खूप आदर करतो. मी त्यांना सांगितले की माझ्याकडे एक कल्पना आहे. चला एकत्र बसून ती लिहूया. मी त्यांना सांगितले की, जरी मी लेखक नसलो तरी, मी कल्पना देऊ शकेन आणि आपण कुठे चुकत आहोत हे ओळखायला मदत करू शकेन, कारण मला पटकथा काही प्रमाणात समजते.”त्यांनी पुढे सांगितले, “ही कथा एका मुलाची होती, ज्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो, ज्यामुळे त्याचे आयुष्य कठीण होते. त्याचे वडील खजुराहो मंदिरात पर्यटक मार्गदर्शक होते. अमितने त्याला महाकाल मंदिरात अर्धवेळ पुजारी होण्याचा सल्ला दिला. आम्ही एकत्र मिळून पटकथा तयार केली आणि त्यात तज्ज्ञ डॉ. प्रकाश कोठारी यांचाही समावेश केला. आमच्या अनेक बैठका झाल्या, कारण आमचा उद्देश चित्रपट शैक्षणिक आणि मनोरंजक बनवण्याचा होता, अश्लील बनवण्याचा नव्हता. आम्ही या प्रक्रियेत पूर्णपणे सहभागी होतो.”परेश रावल यांनी पुढे सांगितले की, अक्षय कुमार यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी त्यांना हा चित्रपट करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी ती विनंती नाकारली. याबाबत ते म्हणाले, “मी जसा विचार केला होता तसा हा चित्रपट नव्हता. या कथेत ईश्वराची कोणतीही भूमिका नव्हती. त्याने माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण मी सुरुवातीपासूनच या पटकथेच्या प्रक्रियेत सहभागी होतो. त्यामुळे ही कथा नेमकी कशी असायला हवी, हे मला ठाऊक होते. म्हणूनच मी या चित्रपटातून बाहेर पडलो.”
अखेर ‘OMG 2’मध्ये वडिलांची भूमिका पंकज त्रिपाठी यांनी साकारली, तर अक्षय कुमार शिवाचा दूत म्हणून पडद्यावर झळकले.