मुंबई,
paresh rawals big claim २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'OMG 2' या चित्रपटाबाबत ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी मोठा दावा करत नवा वाद निर्माण केला आहे. त्यांनी सांगितले की, या चित्रपटाची मूळ कथा आणि संकल्पना त्यांनी दिग्दर्शक अमित राय यांच्यासोबत विकसित केली होती. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना ना कथेचे श्रेय मिळाले, ना त्यांच्या योगदानाचा कुठे उल्लेख करण्यात आला. याच कारणामुळे त्यांनी या प्रकल्पापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विकी लालवाणी यांच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी सांगितले की, त्यांनी तयार केलेली मूळ कथा ही वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित होती. एका शाळकरी मुलाचा खाजगी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाजाकडून त्याला होणारा त्रास आणि आपल्या मुलासाठी न्याय मिळवण्यासाठी वडिलांनी दिलेला कायदेशीर लढा, असा या कथानकाचा गाभा होता. त्यांच्या मते, या कथेत कोणत्याही देवाची किंवा दैवी शक्तीची भूमिका नव्हती. तसेच ही कथा 'OMG' चित्रपटाचा सिक्वेल म्हणूनही लिहिण्यात आलेली नव्हती.
परेश रावल यांनी पुढे सांगितले की, नंतर चित्रपटाची पटकथा पूर्णपणे बदलण्यात आली आणि त्यानंतर अक्षय कुमार या प्रकल्पाशी जोडले गेले. या बदलांमुळे मूळ संकल्पना पूर्णपणे बदलल्याने त्यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, अक्षय कुमार यांनी स्वतः त्यांना चित्रपट करण्याची विनंती केली होती. मात्र, "ही माझ्या कल्पनेतील कथा राहिलेली नाही," असे सांगत त्यांनी ती ऑफर स्वीकारली नाही.
या मुलाखतीत त्यांनी आणखी एक दावा करत सांगितले की, अमित राय, अक्षय कुमार, अश्विन, अजय देवगण, करण जोहर आणि सलमान खान यांना या कथेचा उगम आणि मूळ संकल्पना माहिती होती. त्यांच्या मते, त्यांनी अनेकांना ही कल्पना सांगितली होती. मात्र, धाडसी विषय आणि संभाव्य वाद लक्षात घेऊन काही जणांनी या प्रकल्पात रस दाखवला नव्हता.
परेश रावल यांनी असेही सांगितले की, पटकथा बदलल्यानंतर त्यांनी चित्रपटातून माघार घेतली आणि त्यानंतर वडिलांच्या भूमिकेसाठी पंकज त्रिपाठी यांची निवड करण्यात आली. चित्रपटात अक्षय कुमार यांनी भगवान शिवाच्या दूताची भूमिका साकारली होती. याच मुलाखतीत परेश रावल यांनी त्यांच्या राजकारणातील प्रवासावरही भाष्य केले. अभिनय आणि राजकारण एकाच वेळी सांभाळणे कठीण जात असल्याने त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच 'हेराफेरी' चित्रपटावरून अक्षय कुमार यांच्यासोबत झालेल्या मतभेदांबाबतही त्यांनी भाष्य करत, दोघांमधील वाद आता मिटल्याचे स्पष्ट केले.