कागदाऐवजी आता येणार ‘प्लास्टिकच्या नोटा’

आरबीआयने उचलले मोठे पाऊलपॉलिमर शीट खरेदीसाठी प्रक्रिया सुरू

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
plastic notes डिजिटल पेमेंट आणि युपीआय व्यवहारांचा वापर देशात मोठ्या प्रमाणात वाढला असला, तरी रोखीचे व्यवहार आजही कायम आहेत. अशातच भारतीय चलनी नोटांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी संबंधित नोट छपाई कंपनीने ‘पॉलिमर शीट’ खरेदीसाठी प्रक्रिया सुरू झाले आहे. त्यामुळे भारतात भविष्यात पॉलिमर अर्थात ‘प्लास्टिक नोटा’ पाहायला मिळणार आहे. नोटा तातडीने बदलल्या जाणार नसून याबाबत अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.
 
 
plastic notes
 
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेडने चलनी नोटांसाठी वापरल्या जाणाऱ्या पॉलिमर सब्सट्रेटसंदर्भात प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी जगभरातील पात्र कंपन्यांकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पॉलिमर सब्सट्रेटचा वापर कागदाऐवजी अधिक टिकाऊ चलनी नोटा तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे या प्रक्रियेकडे भारतातील पॉलिमर नोटांच्या संभाव्य वापराच्या दृष्टीने पाहिले जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड ही आरबीआयची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी असून देशातील चलनी नोटांच्या छपाईमध्ये तिची महत्त्वाची भूमिका आहे. पॉलिमर सब्सट्रेटसाठी ईओआय प्रक्रिया सुरू झाल्यामुळे भारतात अशा नोटांच्या वापराच्या शक्यतांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र, कोणत्या मूल्याच्या नोटांसाठी पॉलिमरचा वापर केला जाईल किंवा तो केव्हा सुरू होईल, याबाबत अधिकृत स्पष्टता आवश्यक आहे.
 
कागदी नोटांच्या तुलनेत पॉलिमर नोटा अधिक काळ टिकू शकतात. वारंवार वापरामुळे नोटा फाटणे किंवा खराब होण्याचे प्रमाण तुलनेने कमी राहू शकते. पाणी आणि ओलाव्याचा परिणामही अशा नोटांवर कमी होतो. दीर्घकाळ वापरता येत असल्याने वारंवार नवीन नोटा छापण्याची गरज कमी होऊ शकते. मात्र, त्यांचा उत्पादन खर्च, पुनर्वापर आणि पर्यावरणीय परिणाम यासारख्या बाबींचाही विचार करावा लागतो.
प्लास्टिक किंवा पॉलिमर नोटांविषयी थोडसे
सामान्य चलनी नोटा प्रामुख्याने विशेष प्रकारच्या कागदी किंवा कापूस-आधारित सामग्रीपासून तयार केल्या जातात. पॉलिमर नोटा मात्र विशेष प्रकारच्या सिंथेटिक मटेरियलपासून तयार केल्या जातात. सामान्य भाषेत त्यांना ‘प्लास्टिक नोटा’ म्हटले जाते. जगातील काही देशांमध्ये पॉलिमर नोटांचा वापर केला जातो. या नोटांमध्ये पारदर्शक विंडोसारखी आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करणे शक्य असल्याने बनावट नोटांविरोधातील उपायांसाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.