तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
misa : यवतमाळ पोलिस मुख्यालयात येथे गुरुवार, 16 ते शनिवार, 18 जुलै दरम्यान पोलिस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय पोलिस कर्तव्य मेळाव्यातील डॉग स्कॉड स्पर्धेत यवतमाळ पोलिस दलातील प्रशिक्षित श्वान ‘मिसा’ हिने पहिल्याच फेरीत उत्कृष्ट कामगिरी केली. तिने जमिनीखाली दडवून ठेवलेला मादक पदार्थ अचूक शोधून काढला. तिच्या या कामगिरीचे उपस्थित अधिकारी व स्पर्धकांकडून कौतुक करण्यात आले.
या तीन दिवसीय शिबिरात अमरावती परिक्षेत्रातील यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा व वाशीम या सर्व जिल्ह्यांच्या स्वान पथकांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून पोलिस उपनिरीक्षक शेषराव सेजुळकर (वाशीम) यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत ‘मिसा’ने आपल्या तीक्ष्ण घ्राणशक्तीच्या बळावर जमिनीखाली लपवून ठेवलेला मादक पदार्थ काही क्षणात शोधून काढत आपले कौशल्य सिद्ध केले.
तिच्या अचूक व वेगवान कामगिरीमुळे उपस्थित अधिकारी व स्पर्धकांनी टाळ्यांच्या गजरात तिचे अभिनंदन केले. गुन्हे उघडकीस आणणे, मादक पदार्थ व स्फोटकांचा शोध घेणे तसेच श्वान पथकांची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने या तीन दिवसीय कर्तव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्याच दिवशी ‘मिसा’च्या उल्लेखनीय कामगिरीमुळे यवतमाळ पोलिस दलाच्या डॉग स्कॉडने स्पर्धेत आपली दमदार छाप उमटवली.