तिवसा,
gurukunj-mozari : महसूलमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज, शुक्रवारी अमरावती दौऱ्यादरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री गुरुदेव सेवाश्रम, गुरुकुंज मोझरी येथे सदिच्छा भेट देत आश्रमाच्या विविध उपक्रमांचा सखोल आढावा घेतला. आश्रमातील पदाधिकाऱ्यांशी झालेल्या विस्तृत चर्चेत त्यांनी विकासकामे, प्रलंबित प्रश्न, भाविकांच्या सुविधा आणि भविष्यातील विकास आराखड्यावर सकारात्मक चर्चा केली.
बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजप्रबोधन, ग्रामविकास, राष्ट्रनिर्माण आणि मानवसेवेचा दिलेला संदेश आजही प्रेरणादायी आहे. त्यामुळे गुरुकुंज मोझरी हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक परिवर्तनाची भूमी आहे. या पवित्र स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. विकासकामांबाबत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली.
दौऱ्यादरम्यान विविध सामाजिक संस्था, संघटना व नागरिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांची निवेदने महसूलमंत्र्यांकडे सादर केली. सर्व निवेदने स्वीकारत त्यांनी प्रत्येक मागणीचा गांभीर्याने विचार करण्यात येईल, संबंधित विभागांना आवश्यक सूचना देऊन योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. भेटीदरम्यान आश्रमातील विविध सेवा उपक्रम, आध्यात्मिक कार्य, ग्रामविकास चळवळ आणि समाजहिताचे प्रकल्प यांची माहितीही मंत्र्यांना देण्यात आली. आश्रमाच्या कार्याची दखल घेत त्यांनी या कार्याचे कौतुक करीत शासनाकडून आवश्यक त्या बाबींना प्राधान्य दिले जाईल, असे नमूद केले.
याप्रसंगी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस पद्मश्री जनार्दनपंत बोथे गुरुजी, प्रचारप्रमुख गोपाल कडू, आमदार राजेश वानखेडे, डॉ. राजाभाऊ बोथे, प्रदीप गौरखेडे, अजय गुल्हाने, शुभम बोथे, धीरज इंगळे तसेच तहसीलदार डॉ. मयूर कळसे व आश्रमाचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.