वर्धा,
blo-teachers : बीएलओ म्हणून नियुक्त महिला आश्रम बुनियादी प्राथमिक शाळा, वर्धा येथील सहायक शिक्षक गजानन माहुरे, यशवंत विद्यालय सेलू येथील सहायक शिक्षक धनश्री राऊत, रवींद्रनाथ टागोर हायस्कूल सिंदी (मेघे) वर्धा येथील सुनील कोंडलकर यांचे केलेले निलंबन मागे घ्या, अन्यथा बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने नागपूर विभाग प्रमुख अजय भोयर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.

ज्या ठिकाणी शिक्षकांव्यतिरिक्त इतर कर्मचारी उपलब्ध नाही अशाच ठिकाणी शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्ती देण्याबाबत सूचना आहेत. मात्र, वर्धा जिल्ह्यात शिक्षकांच्याच सेवा मोठ्या प्रमाणात अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. शिक्षक आपले दैनंदिन कामकाज सांभाळून सकाळी व रात्री उशिरापर्यंत काम करीत आहेत. प्रशिक्षणात दिलेल्या सूचना व कार्यपद्धती लक्षात घेता फॉर्म मतदारांनी भरून देणे क्रमप्राप्त असताना मतदारांना फॉर्म वितरण केल्यावर ते परत घेण्यासाठी अनेक ठिकाणी वारंवार मतदारांच्या घरी चकरा मारूनही प्रतिसाद देत नाही, हे वास्तव आहे. शिफ्टेड आणि मृत्यू पावलेल्या मतदारांच्या बाबतीत पंचनामे संबंधाने काम करताना क्षेत्र स्तरावर अनंत अडचणींचा सामना शिक्षकांना करावा लागत आहे. असे असताना देखील शाळेचे कामकाज सांभाळून प्रचंड तणावात शिक्षक काम करीत आहेत.
प्रशासनाकडून वेळोवेळी असलेला तगादा, मतदारांकडून रात्री बे-रात्री फोन करून माहिती विचारणे याबाबत बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षक त्रस्त असून प्रचंड तणावामुळे आजारी पडत आहेत. धनश्री राऊत, गजानन माहुरे, सुनील कोंडलकर आपले काम करीत असताना त्यांच्या वास्तव अडचणी व आजारपण लक्षात न घेता त्यांना निलंबित करणे अनाकलनीय असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. सुनील कोंडलकर हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असताना त्यांना डिजिटलायझेशनचे काम देण्यात आले. निलंबनाची कारवाई तत्काळ रद्द करून सेवेत पुनर्पदस्थापना करताना निलंबन काळ क्षमापित करून सेवाकाळ नियमित करावा, अशी विनंतीही करण्यात आली. यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.