तभा वृत्तसेवा
उमरखेड,
robbers-disguised-as-police : शहरालगतच्या पुसद रोडवरील दहागाव फाट्याजवळ गुरुवारी सकाळी 10.30च्या सुमारास पोलिस असल्याचे भासवून एका 61 वर्षीय वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील पीडिताचे नाव उत्तम गोविंद फाळके (वय 61), रा. मरसूळ, ता. उमरखेड असे आहे. फाळके हे आपल्या दुचाकीने मरसूळ येथून उमरखेडकडे येत होते. दहागाव फाट्याजवळ एका अनोळखी व्यक्तीने त्यांची दुचाकी अडवून स्वतःची ओळख मी पोलिस आहे अशी करून दिली.
यानंतर त्या तोतया पोलिसाने, या रस्त्यावर लुटारूंचा वावर आहे. हातात सोन्याची अंगठी किंवा इतर मौल्यवान वस्तू घालणे धोकादायक आहे, असे सांगून फाळके यांच्या विश्वास मिळवला. त्याने फाळके यांच्या हातातील सोन्याची अंगठी व मोबाईल काढून, हे तुमच्या बॅगेत ठेवतो. वाटेत कुठेही बॅग उघडू नका, असे सांगितले.
फाळके यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून प्रवास सुरू ठेवला. मात्र घरी पोहोचल्यानंतर त्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात मोबाईल होता, पण सोन्याची अंगठी गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घटनेनंतर फाळके यांनी तातडीने उमरखेड पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या घटनेच्या धक्क्याने त्यांची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उमरखेड पोलिस घटनास्थळ परिसरातील माहिती, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करीत आहेत.