युद्धकाळात युक्रेनला नवे नेतृत्व; सेर्ही कोरेत्स्की पंतप्रधान

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
कीव,
Serhiy Koretskyi new PM in Ukraine's रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला चार वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी संघर्ष अद्याप कायम आहे. या युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होत असताना, युक्रेनमध्ये मोठा राजकीय बदल करण्यात आला आहे. गुरुवारी सेर्ही कोरेत्स्की यांची देशाच्या नव्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या युलिया स्विरिडेन्को यांची जागा घेतली आहे.सेर्ही कोरेत्स्की हे यापूर्वी युक्रेनच्या सरकारी मालकीच्या ऊर्जा कंपनी नाफ्तोगाझचे प्रमुख होते. कोणत्याही राजकीय पक्ष, संसद किंवा प्रशासकीय सेवेतून न येता थेट पंतप्रधानपदी पोहोचल्यामुळे त्यांची नियुक्ती विशेष मानली जात आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या कोरेत्स्की यांनी व्यावसायिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली असून, अडचणीत सापडलेल्या सरकारी उद्योगांना तोट्यातून नफ्यात आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांनी इंधन आणि अन्न उद्योगांच्या व्यवस्थापनातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 
 
Serhiy Koretskyi new PM in Ukraine
 
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी येणाऱ्या हिवाळ्यातील कठीण परिस्थितीत देशाला सक्षम नेतृत्व मिळावे, या उद्देशाने कोरेत्स्की यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. संसदेत त्यांना २८९ मते मिळाल्यानंतर त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनची आर्थिक आणि सुरक्षेची परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. अलीकडेच रशियाने कीवसह अनेक भागांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये २१ जणांचा मृत्यू, तर सुमारे ८० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियाविरुद्धच्या युद्धकाळात पंतप्रधानपदाची धुरा सांभाळणारे सेर्ही कोरेत्स्की हे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी संरक्षण मंत्री मिखायलो फेडोरोव्ह यांना पदावरून दूर केले होते. या निर्णयानंतर युक्रेनच्या संसदेबाहेर मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. आता युद्ध, आर्थिक संकट आणि आगामी हिवाळ्याच्या आव्हानांचा सामना करताना कोरेत्स्की यांच्या नेतृत्वाची मोठी कसोटी लागणार आहे.