नवी दिल्ली,
mahaprabhu jagannath भगवान जगन्नाथ यांच्या जीवनावर आधारित 'महाप्रभू जगन्नाथ' या ॲनिमेटेड चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ओडिशा उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यामुळे हा चित्रपट सुरू असलेल्या रथयात्रेदरम्यान प्रदर्शित होणार नाही. मात्र, वार्षिक रथयात्रा उत्सव संपल्यानंतर म्हणजे २८ जुलै रोजी किंवा त्यानंतर चित्रपट प्रदर्शित करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, ओडिशा सरकार, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC), श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन तसेच संबंधित पक्षांना नोटीस बजावत त्यांचे म्हणणे मागवले आहे. चित्रपटगृहांमधील प्रदर्शनावर घालण्यात आलेल्या बंदीविरोधात निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. हा चित्रपट १७ जुलै रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. त्याआधी १६ जुलै रोजी दिल्लीमध्ये विशेष प्रीमियरचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, चित्रपटाविरोधात निर्माण झालेल्या वादामुळे हे विशेष प्रदर्शनही पुढे ढकलण्यात आले.
या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. चित्रपट निर्मात्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय कायम ठेवला.
या चित्रपटाविरोधातील वादाची सुरुवात ओडिशा उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमुळे झाली. अंगुलचे महेश कुमार साहू, पुरीचे डॉ. प्रमोद कुमार आचार्य आणि निमापडाचे उमाशंकर आचार्य यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिकेत चित्रपटाला देण्यात आलेले CBFC प्रमाणपत्र रद्द करण्याची आणि ओडिशामध्ये त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती.
याचिकाकर्त्यांनी चित्रपटात भगवान जगन्नाथ यांच्या बालपणाचे, संवादांचे तसेच साहस आणि युद्धाशी संबंधित काही दृश्यांचे काल्पनिक चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेतला आहे. ही मांडणी स्कंद पुराण, ब्रह्म पुराण आणि श्री जगन्नाथ मंदिराशी संबंधित पारंपरिक धार्मिक श्रद्धांच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्राथमिक आक्षेपांची दखल घेत ओडिशा उच्च न्यायालयाने यापूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनाला अंतरिम स्थगिती दिली होती. श्रीपाद वारखेडकर दिग्दर्शित आणि एली ॲनिमेशन्स निर्मित या चित्रपटाच्या नव्या प्रदर्शनाच्या तारखेची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येण्याची शक्यता आहे.