नवी दिल्ली,
supriya-sule-gets-emotional : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांचे एकत्रिकरण व्हावे, ही दिवंगत नेते अजित पवार (दादा) यांची अंतिम इच्छा होती; परंतु दुसऱ्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे दादांची ही इच्छा अपूर्णच राहिली, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे पत्रकारांशी बोलताना अजित दादांच्या आठवणीने त्या अत्यंत भावुक झाल्या होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "माझ्या भावाला देवाघरी जाऊन आता पाच महिने झाले आहेत. या मोठ्या धक्क्यातून आमचे कुटुंब आता हळूहळू सावरत आहे. माझ्या भावाच्या नावावरून सुरू असलेल्या सर्व राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला पाहिजे. दोन्ही गट एकत्र यावेत आणि त्यांनी मिळून राज्य व देशाची सेवा करावी, ही दादांची अंतिम इच्छा होती. त्यांच्या या इच्छेचा मान ठेवून एकत्रीकरणासाठी आमची पूर्ण तयारी होती."
"आम्ही स्वाभिमानी लोक आहोत"
"दादा असतानाही आमची हीच भावना होती आणि त्यांच्या जाण्यानंतरही ती कायम आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने यासाठी कोणतीही सकारात्मकता दाखवण्यात आली नाही. दादांच्या निधनाच्या दिवशीच आमच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी या विषयाचा उल्लेख केला होता. परंतु, समोरच्या पक्षाने अशी कोणतीही घटना किंवा चर्चा झालीच नसल्याचे सांगत हा विषय फेटाळून लावला. यामुळे आम्हाला प्रचंड मानसिक क्लेश आणि यातना झाल्या. म्हणूनच आम्ही तो विषय त्याच दिवशी नेहमीसाठी बंद केला. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत आणि स्वतःच्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करणार नाही."
समोरच्या पक्षाची मानसिकता स्पष्ट
अजित पवार यांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटातील काही नेत्यांची विधाने पाहिली, तेव्हा त्यांची दादांची अंतिम इच्छा पूर्ण करण्याची कोणतीही मानसिकता नसल्याचे स्पष्ट झाले, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी या विषयावर कायमचा पडदा टाकला असून, आता त्यांचे संपूर्ण लक्ष केवळ महाराष्ट्र राज्य आणि देशाच्या विकासावर आणि लोकसेवेवर केंद्रित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.