नांदेड,
teacher commits suicide नांदेड जिल्ह्यात शिक्षक असलेल्या सुनील मोरे यांनी आपल्या सारा आणि सुशील या दोन लहान मुलांना कारमध्ये बसवून भरधाव कार आमदुरा येथील गोदावरी नदीवरील पुलावरून नदीत झोकून दिल्याची घटना घडली. या घटनेत सुनील मोरेसह त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. भोकर तालुक्यातील बेंबर येथील मूळ रहिवासी असलेले सुनील मोरे हे नांदेड शहरातील अंबानगर परिसरात वास्तव्यास होते. ते शिक्षक म्हणून कार्यरत होते.
प्राथमिक माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून पत्नी कार्यरत असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथील जिल्हा परिषद शाळेसंदर्भात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक त्रासामुळे ते तणावाखाली होते, अशी माहिती समोर येत आहे. घटनेपूर्वी सुनील मोरे यांनी लॅपटॉपमध्ये एक सविस्तर नोट लिहून ठेवल्याची माहिती आहे. तसेच त्यांनी मोबाईलच्या स्टेटसवरही आत्महत्येचा उल्लेख केल्याची माहिती आहे.
या नोटमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी सुरेखा, हिमायतनगरचे गटशिक्षण अधिकारी किशन फुले, केंद्रप्रमुख शिवाजी कदम तसेच सहकारी दत्ता पवळे यांच्याकडून झालेल्या कथित मानसिक छळामुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख आहे. मात्र या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. दरम्यान, गोदावरी नदीत कार झोकून देण्यापूर्वी सुनील मोरे यांनी आपल्या एका मित्राशी दूरध्वनीवर संपर्क साधल्याचीही माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीतून कार बाहेर काढण्यात आली. कारमध्ये सुनील मोरे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून सर्व बाबींचा तपास सुरू केला आहे. कथित आत्महत्येची कारणे, लॅपटॉपमधील मजकूर आणि इतर पुराव्यांची पडताळणी सुरू आहे. अधिकृत तपासानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.