वॉशिंग्टन,
Trump's sensational claim अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२० च्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत चीनच्या कथित हस्तक्षेपाशी संबंधित माहिती लपवण्यात आल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गुप्तचर संस्थांमधील काही अधिकाऱ्यांनी ही माहिती जाणीवपूर्वक दडपून ठेवली आणि ती राष्ट्राध्यक्ष तसेच अमेरिकन जनतेपासून लपवली गेल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. निवडणुकीच्या पारदर्शकतेवर आयोजित कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, अलीकडेच सार्वजनिक झालेल्या कागदपत्रांमधून चीनच्या कथित निवडणूक हस्तक्षेपाबाबतची महत्त्वाची माहिती गुप्तचर यंत्रणांनी कमी लेखल्याचे आणि दडपल्याचे समोर आले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या माहितीमुळे निवडणुकीवर झालेल्या संभाव्य प्रभावाचे गांभीर्य समजू शकले असते.
ट्रम्प यांनी असा आरोपही केला की, २०२० मध्ये अमेरिकी गुप्तचर संस्थांना चीनने अमेरिकेतील १८ राज्यांमधील लाखो मतदारांचा डेटा विकत घेतला, चोरला किंवा हॅक केला असल्याची माहिती होती. मात्र, ही बाब राष्ट्राध्यक्ष किंवा काँग्रेस सदस्यांपर्यंत पोहोचवण्यात आली नाही. त्याऐवजी २०२० ची अध्यक्षीय निवडणूक अमेरिकेच्या इतिहासातील सर्वाधिक सुरक्षित निवडणूक असल्याचा दावा करण्यात आला, असेही त्यांनी म्हटले.सीआयएच्या एका अहवालाचा उल्लेख करत ट्रम्प यांनी दावा केला की, चिनी कम्युनिस्ट पक्षाने २०१८ च्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका आणि २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. तसेच चीनने अमेरिकेतील व्यावसायिक नेते आणि पत्रकारांवर प्रभाव टाकण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. ट्रम्प यांच्या मते, त्यांच्याविरोधात नकारात्मक बातम्या प्रकाशित करणाऱ्या पत्रकारांची ओळख पटवून त्यांना अधिक नकारात्मक लेख लिहिण्यासाठी आर्थिक प्रलोभने देण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.
या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी राष्ट्रीय गुप्तचर संचालक कार्यालय (ODNI), एफबीआय, सीआयए आणि न्याय विभागाला कथित माहिती दडपल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रम्प यांनी यापूर्वीही २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप वारंवार केला असून, त्यांनी २०२० मध्ये व्हाईट हाऊस सोडायला नको होते, असेही यापूर्वी म्हटले होते.दरम्यान, व्हाईट हाऊसच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रशासनाचा आरोप आहे की, २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान चीनने २२ कोटी अमेरिकन मतदारांची माहिती बेकायदेशीररीत्या मिळवली होती. निवडणूक प्रक्रियेतील माहितीचा हा सर्वात मोठा गैरवापर असल्याचा दावा करण्यात आला असून, ही कागदपत्रे व्हाईट हाऊसच्या 'इलेक्शन इंटिग्रिटी इनिशिएटिव्ह' अंतर्गत सार्वजनिक करण्यात आली आहेत.