दुबई ,
US-Iran conflict has been devastating अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ल्यांची मालिका सुरू आहे. अमेरिकेने इराणमधील अनेक भागांवर हवाई कारवाया केल्यानंतर इराणने बहरीन, कुवेत आणि जॉर्डनच्या दिशेने क्षेपणास्त्रे तसेच ड्रोन डागून प्रत्युत्तर दिल्याचा दावा करण्यात आला आहे. बहरीन आणि कुवेतमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ असल्याने या घडामोडींमुळे संपूर्ण आखाती प्रदेशातील तणाव आणखी वाढला आहे.इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNAच्या माहितीनुसार, अमेरिकेने दक्षिणेकडील होर्मोझगान प्रांतातील पुलांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर अमेरिकेने इराणमधील आणखी काही पुलांवर हल्ले करत कारवाईचा विस्तार केला. तसेच अमेरिकन नौदलाच्या नाकेबंदीला कथितपणे आव्हान देणाऱ्या एका जहाजालाही लक्ष्य करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या मते, इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्यासाठी उशिरा रात्री दुसऱ्या टप्प्यातील हवाई कारवाई करण्यात आली. या कारवाया प्रथमच राजधानी तेहरानच्या आसपासच्या भागांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.

इराणी माध्यमांच्या माहितीनुसार, तेहरान, सेमनान, हमादान, होर्मोझगान, खुझेस्तान, लोरेस्तान, मरकाझी, सिस्तान-बलुचिस्तान आणि केशम बेट या भागांवर अमेरिकेचे हल्ले झाले. सेमनान हा इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र निर्मिती आणि अंतराळ कार्यक्रमाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. बंदर अब्बास येथील अल्लाह-अकबर हिल निवासी परिसरावरील हल्ल्यात सात जण जखमी झाले, तर रेल्वे जंक्शनवरील हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. शहराच्या पश्चिमेकडील दोन पुलांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या सेंट्रल कमांड (CENTCOM)ने पर्शियन आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील ग्रेटर तुन्ब बेटावरील इराणच्या संरक्षण आणि क्षेपणास्त्र तळांवर कारवाई केल्याचा दावा केला आहे. हे बेट इराणने १९७१ मध्ये ताब्यात घेतले होते आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणाच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय इराणच्या प्रमुख तेल निर्यात टर्मिनलकडे जाणारे कुराकाओ-ध्वजांकित तेलवाहू जहाज निकामी केल्याचाही दावा अमेरिकेने केला आहे. अनेक इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यानंतर जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.
या कारवायांना प्रत्युत्तर म्हणून इराणने बहरीन, कुवेत आणि जॉर्डनच्या दिशेने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. संबंधित देशांच्या सरकारांनी हल्ल्यांची पुष्टी केली असली, तरी तातडीने कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, इराकचे पंतप्रधान अली अल-जैदी यांनी कुर्दिश भागातील ड्रोन हल्ल्याचा निषेध केला असून संबंधित ड्रोन मार्गातच पाडण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या महिन्यात झालेला अंतरिम शस्त्रसंधी करार आता संपुष्टात आल्याने दोन्ही देश पुन्हा आक्रमक झाले आहेत. या संघर्षाचा केंद्रबिंदू होर्मुझची सामुद्रधुनी आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर इराणने होर्मुझमार्गे जहाजांच्या वाहतुकीवर निर्बंध आणले. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आणि जागतिक ऊर्जा बाजारावर त्याचा परिणाम झाला.
इराणच्या खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाचे प्रवक्ते कर्नल इब्राहिम झोल्फघारी यांनी इशारा देताना म्हटले की, अमेरिकेने इराणमधील पूल आणि वीज प्रकल्पांवर हल्ले सुरूच ठेवले तर इराण संपूर्ण प्रदेशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करू शकतो. होर्मुझच्या सामुद्रधुनीत कोणत्याही बाहेरील देशाचा हस्तक्षेप स्वीकारला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराची शक्यता अद्याप कायम असल्याचे म्हटले असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र अधिक गंभीर बनत चालली आहे. अमेरिकेने इराणच्या बंदरांवर पुन्हा नौदल नाकेबंदी लागू केली असून CENTCOMच्या म्हणण्यानुसार, नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणारी तीन व्यापारी जहाजे अडवण्यात आली. त्यापैकी एक जहाज निष्क्रिय करण्यात आले, तर दुसऱ्या जहाजाची तपासणी करण्यात आली.