‘मी अभिनेता आहे, नेता नाही’

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया चर्चेत

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
मुंबई
vivek oberoi सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आता विविध क्षेत्रांप्रमाणेच मनोरंजन विश्वातूनही पाठिंबा मिळू लागला आहे. २८ जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या त्यांच्या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले असून, सरकारने त्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करावी, अशी त्यांची भूमिका आहे. अनेक कलाकारांनी त्यांना पाठिंबा दर्शवतानाच उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र, अभिनेता विवेक ओबेरॉयने या विषयावर थेट भूमिका घेणे टाळत आपण अभिनेता असून राजकारणी नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
gn
 
माध्यमांशी संवाद साधताना विवेक ओबेरॉय यांना सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. गेल्या २० दिवसांपासून ते दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण करत आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याबरोबरच लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया विचारली असता, विवेक ओबेरॉय यांनी या विषयावर थेट भाष्य करण्याऐवजी स्वतःला एक निरीक्षक असल्याचे सांगितले, जो आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून सातत्याने शिकत असतो.
यावेळी विवेक ओबेरॉय म्हणाले, “मी एक अभिनेता आहे, राजकारणी नाही. त्यामुळे मी राजकीय बाबींकडे लक्ष देत नाही. आम्ही निरीक्षण करतो आणि शिकतो. आयुष्यात पाहण्यासारखं आणि शिकण्यासारखं खूप काही आहे.”
आंदोलनांबाबत त्यांनी नेमके काय पाहिले आणि काय शिकले, असा पुढील प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले, “मी पाहिले की ही देखील एक नवीन गोष्ट होती आणि मला वाटते की निरोगी लोकशाहीमध्ये प्रत्येक आवाजाला स्थान मिळते. या लोकांनी आपला आवाज व्यक्त केला असेल तर ते सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे.”
विवेक ओबेरॉय यांच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या व्हायरल व्हिडिओवर एका नेटकऱ्याने, “सरजी, कृपया कधीतरी अभिनयाच्या क्षेत्रातून बाहेर या, नाहीतर देशाच्या भल्यासाठी कोण लढेल?” अशी टिप्पणी केली आहे.विवेक ओबेरॉय यांनी या आंदोलनाला स्पष्ट पाठिंबा दिला नाही किंवा त्याचा उघडपणे विरोधही केला नाही. त्यांनी आपली भूमिका लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनापुरतीच मर्यादित ठेवली. दरम्यान, प्रकाश राज, नसीरुद्दीन शाह, झीनत अमान, अभय देओल, अतुल कुलकर्णी, सयाजी शिंदे, सोनाक्षी सिन्हा, ‘3 इडियट्स’मधील ओमी वैद्य, विशाल दादलानी, कुनिका सदानंद आणि देवोलीना भट्टाचार्जी यांसारख्या अनेक कलाकारांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.