वारीत अपघातग्रस्त वारकऱ्यांना आता तातडीने आर्थिक मदत

"श्री विठ्ठल रखुमाई वारकरी योजना" अधिक प्रभावी जिल्हाधिकाऱ्यांना थेट निधी वितरित करण्याचे अधिकार

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |

 

मुंबई
wari आषाढी व कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना अपघात किंवा अन्य दुर्घटना घडल्यास आर्थिक मदत मिळण्यात होणारा विलंब टाळण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'श्री विठ्ठल रखुमाई वारकरी योजना' अंतर्गत मदत तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना 'उणे प्राधिकार पत्रा'च्या माध्यमातून थेट कोषागारातून निधी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.या निर्णयामुळे वारीदरम्यान अपघातग्रस्त वारकरी अथवा त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार नाही.


wari 
 
 
wari  आवश्यक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी नियमानुसार मदत मंजूर करून तत्काळ वितरित करू शकणार आहेत.योजनेनुसार वारीदरम्यान अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित वारकऱ्याच्या निकटच्या वारसदारास ४ लाख रुपयांची मदत दिली जाईल. अपघातामुळे ४० ते ६० टक्के अपंगत्व आल्यास ७४ हजार रुपये, तर ६० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आल्यास २ लाख ५० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. तसेच एक आठवड्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात उपचार घ्यावे लागल्यास १६ हजार रुपये, तर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी उपचार सुरू असल्यास ५,४०० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल.
 
wari  ही योजना आषाढी किंवा कार्तिकी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी, सार्वजनिक अथवा खाजगी वाहनाने जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना लागू राहणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित वारकरी वारीसाठी पंढरपूरला गेल्याचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. तहसीलदारांनी आवश्यक पडताळणीनंतर हे प्रमाणपत्र वारकरी किंवा त्यांच्या वारसदारांना उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यानंतर संबंधित वारकरी अथवा त्यांच्या वारसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मदतीसाठी अर्ज करावा लागेल.अर्जासोबत सादर करण्यात आलेले तहसीलदारांचे प्रमाणपत्र, मृत्यू दाखला अथवा वैद्यकीय प्रमाणपत्र यांची जिल्हाधिकारी पडताळणी करून अपघाताचे स्वरूप व नियमांचा विचार करत मदत मंजूर करतील. या नव्या निर्णयामुळे वारीदरम्यान संकटात सापडलेल्या वारकऱ्यांना अधिक वेगाने आर्थिक दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.