मुंबई,
water-scarcity : गेल्या आठवडयात पावसाने दमदार हजेरी लावल्याने प्रमुख धरणांतील पाणीसाठयात काहींशी वाढ झाली असली, तरी राज्यावरील पाणीटंचाईचे संकट अद्याप दूर झालेले नाही. राज्यातील प्रमुख दहा धरणांमध्ये सध्या १८४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. तो गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी कमी आहे. जुलैचा अर्धा महिना लोटून गेला असताना सरासरीपेक्षा कमी जलसाठा सध्या धरणात उपलब्ध असल्याने चिंता वाढली आहे. त्यातच पाऊस अजून लांबल्यास पाणी आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून व्यक्त केली आहे.
धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात सुमारे सहा टक्यांनी वाढ झाली असली तरी गेल्यावर्षी याच दिवसातील पाणीसाठ्यांचा विचार करता अजूनही पाणी टंचाईचे संकट कायम आहे. पर्यायाने राज्यातील २२ जिल्ह्यातील ७३७ गावे आणि १९१८ वाड्यांना आजही ७९० टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, राज्यातील कोयना, जायकवाडी, उजनी, पेंच प्रकल्प समुह, गोसीखुर्द, खडकवासला, मुठा, अप्पर वर्धा, भंडारधारा, आणि इसापूर या प्रमुख धरणात उपयुक्त पाणीसाठा १८४.४७ टीएमसी म्हणजेच ४५ टक्के आहे. गेल्या वर्षी याचवेळी हा साठा २७८.४४ टीएमसी होता. गेल्या वर्षी पेक्षा यंदा हा साठा १२ टक्यानी कमी आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम
नाशिक विभागात सर्वाधिक ३०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण अद्याप समाधानकारक नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. मुंबई, ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टक्का कमी पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पावसाने आणखी काही दिवस ओढ दिल्यास पाणी नियोजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.