भद्रावती,
online defraud भद्रावती शहरात मोठ्या आर्थिक फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली असून, जास्त परताव्याचे आमिष दाखवून एका 29 वर्षीय तरुणाची तब्बल 18 लाख 88 हजार 588 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी भद्रावती पोलिस ठाण्यात अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झिंगुजी वॉर्ड येथील रहिवासी निखिल ऋषी बावणे हा चांदा आयुध निर्माणीच्या रुग्णालयातील रुग्णवाहिकेवर खासगी वाहनचालक म्हणून कार्यरत आहे. 22 जानेवारी 2026 रोजी त्याच्या भ्रमणध्वनीवर एका अज्ञात व्यक्तीकडून संदेश आला. त्यामध्ये काही कामे पूर्ण करून तसेच समभाग बाजारात परकीय चलनाद्वारे गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले.
सुरुवातीला कमी रक्कम गुंतवल्यानंतर त्याला आभासी पद्धतीने मोठा नफा झाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे विश्वास बसलेल्या निखिलने स्वतःच्या तसेच आईच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने रक्कम पाठवण्यास सुरुवात केली. 3 फेब्रुवारी ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत त्याने 35 व्यवहारांद्वारे एकूण 18 लाख 88 हजार 588 रुपये विविध खात्यांमध्ये जमा केले. यानंतर नफा किंवा मूळ रक्कम परत घेण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला.online defraud उलट खाते गोठविल्याचे सांगून आणखी पैसे भरण्याची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निखिल बावणे यांनी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात फसवणुकीतील 2 लाख 10 हजार 140 रुपये सद्या गोठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार कपिल भोयर पुढील तपास करीत आहेत.