यामी गौतमला सर्वोत्तम अभिनेत्रीचा सन्मान

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
मुंबई
72nd national film awards भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (72nd National Film Awards) प्रतीक्षा अखेर संपली आहे. वर्ष २०२४ मधील उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांचा गौरव करण्यासाठी शनिवारी, १८ जुलै रोजी पुरस्कार विजेत्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली. यंदा सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार कार्तिक आर्यन यांना ‘चंदू चॅम्पियन’ आणि मामूट्टी यांना ‘ब्रह्मयुगम’ या चित्रपटांसाठी संयुक्तपणे प्रदान करण्यात आला आहे. सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटासाठी यामी गौतम हिला मिळाला आहे.
 

72nd national film awards 
हिंदी चित्रपटसृष्टीचे सखोल आकलन आणि समीक्षात्मक योगदानासाठी ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्तम चित्रपट समीक्षक म्हणून संजीव श्रीवास्तव यांना देण्यात आला आहे.
यंदाच्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार ‘आर्टिकल ३७०’ला मिळाला आहे. सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार आनंद एल राय यांना ‘एकता का प्रतीक’साठी प्रदान करण्यात आला. सर्वोत्तम हिंदी फीचर फिल्मचा पुरस्कार ‘श्रीकांत’ या चित्रपटाने पटकावला.
प्रादेशिक चित्रपटांच्या विभागात सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ला मिळाला आहे. सर्वोत्तम तेलुगू चित्रपट म्हणून ‘कमेटी कुल्लु’, सर्वोत्तम तमिळ चित्रपट म्हणून ‘रायन’, सर्वोत्तम ओडिया चित्रपट म्हणून ‘लहरी’, सर्वोत्तम मल्याळम चित्रपट म्हणून ‘फेमिनिची फातिमा’, सर्वोत्तम कन्नड चित्रपट म्हणून ‘मिथिया’, सर्वोत्तम गुजराती चित्रपट म्हणून ‘मारान’, सर्वोत्तम गढवाली चित्रपट म्हणून ‘ढोली’, सर्वोत्तम बंगाली चित्रपट म्हणून ‘चित्रलेखा एखोन’, सर्वोत्तम आसामी चित्रपट म्हणून ‘जुईफूल’ आणि सर्वोत्तम मणिपुरी चित्रपट म्हणून ‘सुनिता’ यांची निवड करण्यात आली.सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार मराठी चित्रपट ‘हमसफर’ला मिळाला आहे. सर्वोत्तम नॉन-फीचर चित्रपटाचा पुरस्कार ‘भंगार’ (मराठी-इंग्रजी) या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार ‘राम-नामी’ (हिंदी) आणि सर्वोत्तम कला-संस्कृती चित्रपटाचा पुरस्कार ‘मैं निदा’ (हिंदी) यांना देण्यात आला. सर्वोत्तम ऐतिहासिक चित्रपटाचा पुरस्कार ‘काकोरी’ (हिंदी) या चित्रपटाने पटकावला.
तांत्रिक विभागात ‘स्त्री २’ मधील ‘आज की रात’ गाण्यासाठी विजय गांगुली यांना सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार ‘जाने दो’ या गाण्यासाठी मनोज मुंतशिर यांना मिळाला. सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘आर्टिकल ३७०’साठी शाश्वत सचदेव यांना प्रदान करण्यात आला.
‘कमेटी कुल्लु’साठी पी. रविकुमार यांना सर्वोत्तम मेकअपचा पुरस्कार मिळाला, तर ‘पुष्पा २’साठी दीपावली नूर आणि शीतल शर्मा यांना सर्वोत्तम वेशभूषेचा पुरस्कार देण्यात आला. ‘कल्कि २८९८ एडी’साठी नितीन चौधरी यांना सर्वोत्तम प्रॉडक्शन डिझाइनचा सन्मान मिळाला. सर्वोत्तम एडिटिंगचा पुरस्कार मानविर जसरोइतिया यांना, तर ‘भूल भुलैया ३’ला सर्वोत्तम साउंड डिझाइनचा पुरस्कार मिळाला.
‘पुष्पा २’साठी बांद्रेड्डी सुकुमार यांना सर्वोत्तम पटकथा लेखकाचा पुरस्कार, तर ‘लकी भास्कर’साठी वेंकी अटलुरी यांना सर्वोत्तम संवाद लेखकाचा पुरस्कार मिळाला. ‘लाइफ इन लूम’साठी एडमॉड यांना सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार देण्यात आला.
पार्श्वगायनाच्या विभागात सर्वोत्तम महिला पार्श्वगायिकेचा पुरस्कार मल्याळम भाषेसाठी वैकोम विजयलक्ष्मी यांना मिळाला, तर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकाचा पुरस्कार मराठीसाठी अभय जोधपूरकर यांना प्रदान करण्यात आला. ‘ओंको की कोठी’ या चित्रपटासाठी रिद्धिमान बनर्जी, तपोमोय देब आणि गीताश्री चक्रवर्ती यांना सर्वोत्तम बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला.
अभिनयाच्या इतर विभागांमध्ये ‘महाराजा’साठी सचना नामिदास यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा, तर ‘भक्षक’साठी संजय मिश्रा यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार रवी राज मुर्मू यांना देण्यात आला.
या वर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) प्रमाणपत्र मिळालेल्या चित्रपटांचा समावेश करण्यात आला होता. चित्रपटांची निवड आणि विजेत्यांची अंतिम निवड करण्याची जबाबदारी ११ सदस्यांच्या विशेष परीक्षक मंडळावर सोपवण्यात आली होती. या उच्चस्तरीय ज्युरीचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट निर्माते जयराज होते. यापूर्वी २०१२ मध्येही जयराज राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या ज्युरीचा भाग राहिले आहेत.
देशभरातून आलेल्या चित्रपटांच्या प्रवेशिकांचे परीक्षण केल्यानंतर या परीक्षक मंडळाने यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची अंतिम निवड केली.