मुंबई
aamir khan अभिनेता सलमान खाननंतर आता बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान हा कथितरित्या बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आल्याचा दावा करण्यात आला आहे. आमिर खानला सोशल मीडियाच्या माध्यमातून धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. ही धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या ‘अर्जू बिश्नोई’ याच्याकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या कथित धमकीची एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या वतीने आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट्स तसेच ऑडिओ क्लिप्स शेअर करून आमिर खानला धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या धमकीच्या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्ट्स आणि ऑडिओ क्लिपची तपासणी सुरू आहे.
या प्रकरणाबाबत मुंबई पोलिसांकडे अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. तसेच, पोलिसांकडून सोशल मीडियावरील दावे आणि व्हायरल ऑडिओची सत्यता पडताळण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित पोस्टमध्ये या धमकीमागील कारणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये आमिर खानवर ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला असून, याच कारणामुळे त्याला लक्ष्य करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे, “जय श्री राम जय सीता राम. मी, आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई (लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य), असे जाहीर करतो की आमीर खानसारखे लोक आपल्या देशात ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देत आहेत. ही गोष्ट आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे. आम्ही हे कृत्य खपवून घेणार नाही आणि त्याला लवकरच चोख प्रत्युत्तर दिले जाईल. हे कृत्य आपल्या सनातन धर्माच्या आणि राष्ट्राच्या विरोधात आहे.”
या कथित पोस्टमध्ये पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, “आम्ही आमच्या बंधू-भगिनींना आणि देशवासियांना वचन देतो की, जो कोणी या घृणास्पद कृत्याला प्रोत्साहन देईल, त्याला आमच्या पद्धतीने धडा शिकवला जाईल. स्टारडमच्या नावाखाली जे लोक या गोष्टीला प्रोत्साहन देत आहेत, आम्ही त्यांचे श्वास रोखू.”दरम्यान, या व्हायरल पोस्ट आणि कथित ऑडिओ क्लिपबाबत आमिर खान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तसेच, संबंधित तपास यंत्रणा किंवा पोलिसांनीही या दाव्याला दुजोरा दिलेला नाही किंवा त्याचे खंडनही केलेले नाही.उल्लेखनीय म्हणजे, आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाबाबत यापूर्वी त्याच्याविरोधात फतवाही जारी करण्यात आल्याचे सांगितले जाते. सध्या सोशल मीडियावर करण्यात आलेल्या या धमकीच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा आमिर खानच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.