नवी दिल्ली,
abhijit deepake जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. 'झुरळ जनता पार्टी' (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत स्वतः आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. तसेच २० जुलै रोजी प्रस्तावित मोर्चा कोणत्याही परिस्थितीत नियोजित वेळेनुसार काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जंतरमंतर येथे पत्रकारांशी संवाद साधताना अभिजीत दीपके म्हणाले की, सोनम वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असले तरी आंदोलन थांबणार नाही. उलट ही चळवळ अधिक व्यापक केली जाईल. त्यांनी समर्थकांना मोठ्या संख्येने जंतर मंतर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करत आपण तत्काळ आमरण उपोषण सुरू करत असल्याची घोषणा केली.
दीपके यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरही गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी सोनम वांगचुक यांना चादरीखाली झाकून घटनास्थळावरून बाहेर नेले. या पद्धतीची तुलना त्यांनी चोर किंवा गुंडांच्या वर्तनाशी करत पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी २० दिवसांपासून उपोषणावर असलेल्या सोनम वांगचुक यांना वैद्यकीय तपासणीसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले आहे.abhijit deepake त्यांच्या प्रकृतीची काळजी लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
सोनम वांगचुक हे २८ जूनपासून जंतर मंतर येथे उपोषण करत आहेत. नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, २० जुलै रोजी प्रस्तावित मोर्चाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अभिजीत दीपके यांनी केलेले आरोप आणि पोलिसांची कारवाई यामुळे या प्रकरणावर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.