लंडन,
andy burnham ब्रिटनमधील राजकीय अस्थिरतेच्या पृष्ठभूमीवर देशाला गत दशकातील सातवे पंतप्रधान मिळणार आहेत. लेबर पार्टीचे ज्येष्ठ नेते अँडी बर्नहॅम यांची शुक्रवारी पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झाली. ते पुढील आठवड्यात कीर स्टार्मर यांच्या जागी पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. लेबर पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या अध्यक्षा शबाना महमूद यांनी लंडनमध्ये एका विशेष पक्ष परिषदेत ही घोषणा केली. त्या म्हणाल्या, केवळ एकाच खासदाराला उमेदवारी देण्यात आली होती़ त्यामुळे स्पर्धा सोपी होती. सोमवारी, पद सोडणारे पंतप्रधान कीर स्टार्मर राजांकडे औपचारिकपणे आपला राजीनामा सादर केल्यानंतर राजा चार्ल्स तिसरे अँडी बर्नहॅम यांना नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतील.
‘किंग ऑफ द नॉर्थ’ म्हणून लोकप्रिय असलेले बर्नहॅम केवळ देशाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठीच जबाबदार नसतील, तर वेगाने उदयास येत असलेल्या ‘रिफॉर्म यूके’ पक्षाच्या आव्हानाला सामोरे जाणे ही त्यांची सर्वात मोठी परीक्षा असेल. ग्रेटर मँचेस्टरचे महापौर म्हणून अँडी बर्नहॅम यांनी प्रदेशाच्या हिताचे रक्षण केल्यामुळे त्यांना ‘किंग ऑफ द नॉर्थ’ हे टोपणनाव मिळाले. सोमवारी ते पंतप्रधान झाल्यावर मंत्रिमंडळ आणि सरकार चालवण्याची त्यांची पद्धत निश्चित करेल.