वालचंदनगर
ashadhi wari १८ जुलैसंत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या 'चरणसेवा' उपक्रमास यंदा मोठा प्रतिसाद लाभला. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांना आराम मिळावा आणि त्यांच्या प्रवासातील शारीरिक ताण हलका व्हावा, या उदात्त उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
वारी मार्गावरील विसाव्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध 'चरणसेवा' केंद्रांमध्ये स्वयंसेवकांनी अत्यंत आत्मीयतेने वारकऱ्यांचे स्वागत केले. यावेळी पायांची स्वच्छता, तेल मालिश आणि प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या सेवाभावी उपक्रमामुळे वारकऱ्यांच्या प्रवासात मोठा दिलासा मिळाला असून, भक्ती, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा एक सुंदर संगम अनुभवायला मिळाला. या उपक्रमाबद्दल वारकरी आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त केले जात आहे.
पुणे जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना, युवक मंडळे आणि नागरिक या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेने दिवसभर वारकऱ्यांची सेवा करत 'सेवा हीच खरी ईश्वरभक्ती' हा संदेश कृतीतून दिला. या सेवा कार्याचे कौतुक करत अनेकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
सेवा हीच भाग्य - रामेश्वर नाईक
या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले की, "आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. वारकऱ्यांच्या चरणांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्यच आहे. या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद समाजातील सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची भावना अधिक दृढ करणारा आहे. भविष्यातही अशा सेवाभिमुख उपक्रमांमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे."