भोंदू अशोक खरातच्या अडचणी वाढल्या

ईडीकडून ३ हजार पानी आरोपपत्र दाखल, ४२ कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा दावा

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
पुणे
ashok kharat भोंदू बाबा अशोक खरातच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अशोक खरातविरोधात तब्बल ३ हजारांहून अधिक पानी आरोपपत्र विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केले आहे. या आरोपपत्रात खरातच्या कथित आर्थिक व्यवहारांवर विशेष भर देण्यात आला असून त्याच्या संपत्तीचा तपशील, आर्थिक व्यवहार आणि पत्नीच्या भूमिकेचाही उल्लेख करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 

ashok kharat ed chargesheet filed over alleged money laundering worth rs 42 crore 
ईडीच्या आरोपपत्रानुसार, अशोक खरातने भक्तांची विविध माध्यमांतून फसवणूक करून तब्बल ४२ कोटी रुपयांची कथित मालमत्ता जमवल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याला समर्थन देण्यासाठी विविध पुरावेही आरोपपत्रात सादर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, खरातने बनावट पद्धतीने १४२ बँक खाती उघडल्याचा आरोपही ईडीने केला आहे.ईडीच्या तपासात अशोक खरातच्या कथित गुन्हेगारी उत्पन्नाची रक्कम ४२.८८ कोटी रुपये असल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत १९.२० कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय तपास आणि शोध मोहिमेदरम्यान १७.७० कोटी रुपयांची रोकड, बँक ठेवी, विदेशी चलन, सोने-चांदीचे दागिने तसेच मर्सिडीज कार जप्त करण्यात आल्याचे ईडीने आरोपपत्रात नमूद केले आहे.खरातचा सहकारी अरविंद बावाके याने १८ ते २० कोटी रुपयांच्या रोख व्यवहारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, एका सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नामकरण आवारे यांनी ३४ बेनामी खाती उघडण्यास मदत करून आर्थिक व्यवहार लपवण्यात सहकार्य केल्याचा आरोप तपासातून समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे.काही बँक व्यवस्थापकांनी केवायसी नियमांचे उल्लंघन करून बेनामी खाती उघडण्यास तसेच मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा आणि काढण्यास मदत केल्याचा आरोपही ईडीने केला आहे. याशिवाय अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिने कथित बेकायदेशीर निधीतून खरेदी करण्यात आलेल्या मालमत्ता स्वतःच्या नावावर नोंदवून मनी लॉन्डरिंगमध्ये मदत केल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे.
 
 
सरकारवाडा, शिर्डी, सिन्नर ashok kharat  आणि राहाता पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या फसवणूक, खंडणी आणि धमकीच्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीकडून मनी लॉन्डरिंगचा तपास सुरू करण्यात आला होता. या तपासानंतर ईडीने आता न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.
दरम्यान, अशोक खरातविरोधातील प्रकरण मंत्रतंत्राच्या नावाखाली फसवणूक आणि महिलांच्या कथित लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. त्याच्यावर महिलांच्या असहायतेचा गैरफायदा घेत लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाशी संबंधित काही व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती आणि पोलिसांनी खरातला अटक केली होती.
यानंतर त्याच्या वाढलेल्या संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान कोट्यवधी रुपयांच्या कथित मालमत्तेचा आणि आर्थिक व्यवहारांचा खुलासा झाल्याचा दावा करत ईडीने अखेर अशोक खरातविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.