१० हॉटेल, बेकरींचे परवाने एफडीएकडून निलंबित

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
पुणे
fda अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि गंभीर स्वच्छतेच्या त्रुटी आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागातील दहा खाद्य आस्थापनांवर कठोर कारवाई केली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, डेअरी आणि कॅन्टीन अशा विविध आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.
 

fda suspends licenses of 10 food establishments in pune division over safety violations 
एफडीएकडून गुरुवार आणि शुक्रवारी पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध खाद्य व्यवसायांची तपासणी करण्यात आली. तपासणीत अनेक ठिकाणी अन्नपदार्थ तयार करण्याच्या परिसरात अस्वच्छता, अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन तसेच आवश्यक नियम आणि निकषांचे पालन न केल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित आस्थापनांवर तातडीने कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले.
पुणे शहरातील मंगळवार पेठ येथील स्टार केटरिंग सर्व्हिस, सोमवार पेठेतील अशोक बार अँड रेस्टॉरंट, येवलेवाडीतील गोल्डन मॅजेस्टिक बेकरी, कोंढव्यातील गोल्डन बेकरी आणि बाणेर येथील बिकांगे बिर्याणी एलएलपी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय आंबेगाव तालुक्यातील सिद्धार्थ ॲग्रो (डेअरी), सांगलीतील हलद भवन कॅन्टीन, महाबळेश्वरमधील सह्याद्री रेस्टॉरंट अँड ढाबा आणि सिगडी रेस्टॉरंट तसेच करवीर तालुक्यातील व्हीबीजीओआर शाळा कॅन्टीनचा अन्न व्यवसाय परवानाही निलंबित करण्यात आला आहे.
दरम्यान, लोहगाव येथील एका खाद्य आस्थापनात ग्राहकांची दिशाभूल करणारी बाब एफडीएच्या तपासणीत समोर आली. येथे ‘बन मस्का’ तयार करताना बटरऐवजी व्हेजिटेबल फॅट स्प्रेडचा वापर केला जात असल्याचे आढळले. मात्र, याबाबत ग्राहकांना कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नव्हती. त्यामुळे संबंधित आस्थापनाची नोंदणीही निलंबित करण्यात आली.
एफडीएने सर्व खाद्य व्यावसायिकांना अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांना शुद्ध पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देणे, फूड-ग्रेड पॅकेजिंगचा वापर करणे, वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर टाळणे आणि अन्नपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांची स्पष्ट माहिती ग्राहकांना देणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बटरऐवजी फॅट स्प्रेड, पनीरऐवजी पनीर ॲनालॉग किंवा कृत्रिम रंगांचा वापर करून ग्राहकांची फसवणूक किंवा दिशाभूल केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही एफडीएकडून देण्यात आला आहे.