मुंबई
govinda बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता गोविंदा तब्बल सात वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी ‘रूपा’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतीच गोविंदाने मुंबईत पत्रकार परिषद घेत या चित्रपटाची अधिकृत माहिती दिली. एकीकडे संपूर्ण सिनेसृष्टी गोविंदाच्या या नव्या इनिंगचे स्वागत करत असताना, दुसरीकडे त्याला घरातूनच एका अनपेक्षित प्रतिक्रियेला सामोरे जावे लागले आहे.
गोविंदाच्या कमबॅकवर त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी व्यक्त केलेली नाराजी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. नवऱ्याच्या एवढ्या मोठ्या करिअरच्या टप्प्यावर सुनीता यांनी दिलेली थेट प्रतिक्रिया पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, या नाराजीमागे कोणताही कौटुंबिक वाद नसून मुलगा यशवर्धन आहुजा याच्या बॉलिवूड पदार्पणाशी संबंधित कारण असल्याचे समोर आले आहे.एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांनी सुनीता आहुजा यांना गोविंदाच्या ‘रूपा’ या आगामी चित्रपटाबाबत आणि सात वर्षांनंतरच्या पुनरागमनाबद्दल प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी त्यांनी कौतुक करण्याऐवजी नाराजी व्यक्त केली.सुनीता म्हणाल्या, “हा रूपा-वूपाचा नाद आधी सोडा आणि या चित्रपटाबद्दल माझ्यासमोर अजिबात बोलू नका!”सुनीता यांच्या या वक्तव्यानंतर गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबातील मतभेदांबाबत चर्चा सुरू झाली. मात्र, या प्रतिक्रियेमागे वेगळे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या सुनीता आहुजा यांचे संपूर्ण लक्ष मुलगा यशवर्धन आहुजा याच्या बॉलिवूड पदार्पणावर आहे. यशवर्धन लवकरच निर्माती एकता कपूर यांच्या मोठ्या बॅनरअंतर्गत तयार होणाऱ्या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात सुनीता स्वतः यशवर्धनच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहेत.मुलाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर प्रसारमाध्यमांनी आणि फिल्म इंडस्ट्रीने त्याच्या चित्रपटावर अधिक चर्चा करावी, अशी सुनीता यांची इच्छा आहे. गोविंदाच्या कमबॅकला मिळणाऱ्या मोठ्या प्रसिद्धीमुळे मुलाच्या पदार्पणाकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी त्यांची भूमिका असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, गोविंदाच्या ‘रूपा’ या चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले असून, सात वर्षांनंतर अभिनेता कोणत्या अंदाजात पडद्यावर परततो, याची उत्सुकता कायम आहे.