पुणे
ketan agrawal murder case पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी या प्रकरणाशी संबंधित नवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिचे वडील प्रवीण गोयल यांच्या दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) अचानक छापा टाकत मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ जप्त केले. या कारवाईनंतर प्रवीण गोयल भावूक झाले असून त्यांनी संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
FDA च्या कारवाईनंतर दुकान बंद ठेवण्याची वेळ आल्याने प्रवीण गोयल यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. “जर माझी मुलगी दोषी असेल तर तिला फाशी द्या, पण आमच्या निर्दोष कुटुंबाला मानसिक त्रास देऊ नका,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
प्रवीण गोयल यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाने त्यांचे दुकान सील केलेले नाही. मात्र, लायसन्सशी संबंधित एक प्रक्रिया प्रलंबित असल्याने त्यांना ८ ते १० दिवस काम बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि त्याचे ते पालन करत आहेत.
“मी कायदा आणि न्यायव्यवस्थेचा पूर्ण आदर करतो. तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. जर माझ्या मुलीने गुन्हा केला असेल आणि ती दोषी सिद्ध झाली, तर तिला नक्कीच फाशी द्या. पण तिच्या शिक्षेचा त्रास माझा मुलगा साहिल, माझी पत्नी आणि मला का सहन करावा लागत आहे?” असा सवाल प्रवीण गोयल यांनी उपस्थित केला.आपल्या कुटुंबाला वारंवार लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करत ते म्हणाले की, “आम्हाला वारंवार टार्गेट केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमचे संपूर्ण कुटुंब प्रचंड मानसिक तणावाचा सामना करत आहे.”दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपासाचा वेग वाढला असून पुणे ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राजस्थानमध्ये पोहोचले आहे. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी काही महिन्यांपूर्वी राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिरात गुपचूप लग्न केल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पथकाने खाटू श्याम मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तेथील नोंदींचीही पाहणी केली.
मात्र, पोलिसांच्या तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित लग्नाचा कोणताही पुरावा किंवा सीसीटीव्ही फुटेज अद्याप हाती लागलेले नाही. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून विविध बाजूंचा तपास केला जात आहे.