दारव्हा,
krantikari shetkari sanghatana आरटीई कायद्याच्या कलम 5(1) चे उघडपणे उल्लंघन करून दारव्हा तालुक्यातील खाजगी शाळांमधुन खाजगी पब्लिकेशनची पुस्तके, गणवेश व लिखाण साहित्यापोटी पालकांची बेकायदेशीर आर्थिक लूट केली जात आहे. या मनमानी कारभाराविरोधात शुक्रवार, 17 जुलै रोजी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष प्रशांत सुरसकार व दारव्हा येथील माजी नगरसेवक रवी तरटे यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

संघटनेने यापूर्वी 9 जुलै रोजी गटशिक्षणाधिकारी दारव्हा यांना 7 दिवसांचा अंतिम इशारा देणारे निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे तीव्र पाऊल उचलावे लागल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापनाकडून कमिशनखोरीसाठी अधिकृत केंद्रीय व राज्याचे अभ्यासक्रम बाजूला सारून पालकांवर महागड्या खाजगी प्रकाशनांची पुस्तके खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. जोपर्यंत गरीब व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार प्रशांत सुरसकार व रवी तरटे यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनाला दारव्हा तालुक्यातील शेकडो पालकांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला असून उपोषण स्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमू लागली आहे.