मुंबई
maharashtra st bus राज्यातील वाढत्या इंधन आणि देखभाल खर्चाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना आता अधिक भाडे मोजावे लागणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, ही दरवाढ आज, १७ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून लागू होणार आहे. या निर्णयानंतर यापूर्वी लागू करण्यात आलेली साध्या बसेसची १० टक्के हंगामी भाडेवाढ आपोआप रद्द होणार आहे.
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून ही भाडेवाढ मंजूर करण्यात आली आहे. वाढत्या खर्चाचा मोठा आर्थिक भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना अखंड सेवा देताना एसटीच्या दैनंदिन कामकाजावर ताण निर्माण होत असल्याने सेवा सुरळीत आणि सक्षम ठेवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
महामंडळाच्या मते, या भाडेवाढीमुळे एसटीची आर्थिक स्थिती बळकट होण्यास मदत होईल. त्याचबरोबर प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा अखंडपणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवा आणि देखभाल व्यवस्थेलाही याचा आधार मिळणार आहे.
एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनीही या निर्णयाचे समर्थन केले आहे. प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेतच ही भाडेवाढ करण्यात आली असून, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित प्रवासी सेवा देणे हेच या निर्णयामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
आज मध्यरात्रीपासून लागू होणाऱ्या नव्या दरांनुसार राज्यभरातील सर्व एसटी सेवांचे भाडे १३.५६ टक्क्यांनी वाढणार असून, त्याचवेळी साध्या बसेससाठी यापूर्वी लागू करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द होणार आहे.