मालेगाव
election सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मालेगाव तालुका खरेदी-विक्री व प्रक्रिया संस्थेची निवडणूक आगामी काळात होण्याची दाट शयता आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून नुकतीच विविध सेवा सहकारी संस्थामधून मतदार प्रतिनिधींची निवड प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीत तालुयातील तीन बड्या आणि मातब्बर नेत्यांची मतदार प्रतिनिधी पदी निवड झाल्याने आगामी निवडणूक अत्यंत अटीतटीची आणि काट्याची होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

तालुयातील एकूण८८ सहकारी संस्थांमधून मतदार प्रतिनिधी निवडले गेले आहेत. यामध्ये:जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक प्रकाश कुटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिलीप जाधव, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाल पाटील राऊत या तीनही दिग्गज नेत्यांची मतदार प्रतिनिधी पदी वर्णी लागल्यामुळे मालेगाव तालुयाच्या राजकीय वर्तुळात आतापासूनच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे तीनही नेते आगामी खरेदी-विक्री संस्था संचालक पदाच्या निवडणुकीत थेट रिंगणात उतरण्याची दाट शयता आहे. या तिघा नेत्याबरोबरच खरेदी विक्री संस्था मतदार प्रतिनिधी पदी विद्यमान अध्यक्ष भगवान शिंदे, काँग्रेसचे मधुमामा काळे, शिवसेनेचे प्रदीप पाटील कुटे, हेही मतदार प्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हे तिन्ही गट एकमेकासमोर ठाकले होते. त्या निवडणुकीत तांत्रिक कारणामुळे दिलीप जाधव यांना स्वतः उभे राहता आले नव्हते, मात्र त्यांनी आपले चिरंजीव नितीन जाधव यांना मैदानात उतरवून गोपाल पाटील राऊत व प्रकाश पाटील कुटे यांच्याविरुद्ध तगडे आव्हान उभे केले होते. या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत नितीन जाधव यांनी विजय मिळवून जाधव यांनी तालुयाच्या राजकारणात आपले वर्चस्व कायम राखले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत या तिन्ही मातब्बरांच्या ईर्षेमुळे तालुयात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली होती. आता पुन्हा एकदा हे तिन्ही प्रतिस्पर्धी खरेदी-विक्री संस्थेच्या मतदार यादीत आमनेसामने आल्यामुळे, या निवडणुकीतही राजकीय प्रतिष्ठा आणि आर्थिक गणिते पणाला लागतील यात शंका नाही.