मेरठ
meerut police उत्तर प्रदेश पोलिसांतील एका हेड कॉन्स्टेबलवर पोलीस ठाण्याच्या मालखान्यात जमा असलेली शस्त्रे चोरून त्यांची बेकायदेशीर विक्री केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मेरठमधील मवाना परिसरात पोलिसांनी एका तरुणाला अनेक शस्त्रे आणि काडतुसे जप्त करून अटक केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. चौकशीदरम्यान जप्त करण्यात आलेली शस्त्रे त्याला त्याचा चुलत भाऊ अमित कुमार यादव याने दिल्याची माहिती समोर आली. अमित कुमार यादव हा सध्या शामली जिल्ह्यातील कांधला पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असून मालखाना प्रभारी (हेड मोहर्रिर) म्हणून त्याच्याकडे जबाबदारी होती. या प्रकरणानंतर तो फरार झाला असून त्याच्या अटकेसाठी मेरठ आणि शामली पोलिसांची संयुक्त पथके सातत्याने छापे टाकत आहेत.
गुरुवारी उशिरा सायंकाळी मवाना पोलिसांनी मखदूमपूर अड्डा परिसरात संशयास्पद हालचालींच्या आधारे मटौरा येथील रहिवासी केशू यादव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून .32 बोअरची पिस्तूल, 38 बोअरची मेड इन इंग्लंड वेब्ली स्कॉट रिव्हॉल्व्हर, तीन तमंचे तसेच अनेक काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत केशू यादवने ही सर्व शस्त्रे त्याचा चुलत भाऊ अमित कुमार यादव याने विक्रीसाठी दिल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान अमित कुमार यादव याच्याकडे कांधला पोलीस ठाण्याच्या मालखान्याची जबाबदारी असल्याचे उघड झाले. या काळात त्याने मालखान्यात जमा असलेली परवानाधारक पिस्तुले, रिव्हॉल्व्हर, तमंचे आणि काडतुसे चोरल्याचा आरोप आहे. त्यानंतर ही शस्त्रे त्याने त्याचा नातेवाईक केशू यादव आणि त्याचा साथीदार तुषार यांच्याकडे बेकायदेशीर विक्रीसाठी सुपूर्द केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. फरार अमित आणि तुषार यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने छापेमारी सुरू आहे.
जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची पडताळणी करताना आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. केशू यादवकडून जप्त झालेल्या 38 बोअरच्या वेब्ली स्कॉट रिव्हॉल्व्हरची नोंद कांधला पोलीस ठाण्याच्या मालखान्यातील अभिलेखांशी जुळून आली नाही. त्यामुळे ही रिव्हॉल्व्हरही एखाद्या मालखान्यातून चोरी करण्यात आली होती की ती अन्य कोणत्या बेकायदेशीर मार्गाने आरोपीपर्यंत पोहोचली, याचा तपास पोलीस करत आहेत.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मेरठचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अविनाश पांडेय यांनी याची माहिती मेरठ परिक्षेत्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक भानु भास्कर यांना दिली. त्यांच्या निर्देशानंतर शामली पोलिसांनी तातडीने कारवाई करत कांधला पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बच्चू सिंह यांच्या तक्रारीवरून हेड कॉन्स्टेबल अमित कुमार यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. मवाना पोलिसांनी जप्त केलेल्या .32 बोअरच्या पिस्तुलाचा परवाना कांधला येथील शाविर जंग यांच्या नावावर होता. शाविर जंग यांचा शस्त्र परवाना जिल्हाधिकारी, शामली यांनी 2020 मध्ये रद्द केला होता. त्यानंतर 22 ऑगस्ट 2020 रोजी संबंधित पिस्तूल नियमानुसार कांधला पोलीस ठाण्याच्या मालखान्यात जमा करण्यात आले होते. मात्र, तेच पिस्तूल आता आरोपीकडून जप्त झाल्याने मालखान्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर तसेच नोंदवहीच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, केशू यादव याला बेकायदेशीर शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली असून चौकशीत हेड कॉन्स्टेबल अमित कुमार यादव याची भूमिका स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. फरार अमित आणि त्याचा साथीदार तुषार यांचा शोध सुरू असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. तसेच मालखान्यातून चोरीला गेलेली शस्त्रे कोणत्याही गुन्हेगारी जाळ्यापर्यंत पोहोचली आहेत का, याचाही पोलीस कसून तपास करत आहेत.