रानपिंगळा दर्शन व गाविलगडचा किल्ला ठरले आकर्षणाचे केंद्र

बहार नेचर फाउंडेशनचा मेळघाट अभ्यास दौरा

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
वर्धा,
melghat study बहार नेचर फाउंडेशनद्वारे नियमित आयोजित केल्या जाणार्या अभ्यासदौर्याचे या वर्षाचे आकर्षण मेळघाटातील दुर्मिळ रानपिंगळ्याचे दर्शन आणि रिमझिमत्या पावसात जाणून घेतलेला गाविलगड किल्ल्याचा इतिहास हे ठरले.
 

melghat study tour attracts nature lovers with rare jungle owlet sighting and gavilgadh fort exploration 
बहार संस्थेद्वारे यावर्षी मेळघाट या नैसर्गिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थळाला भेट देण्यात आली. या तीन दिवसीय अभ्यासदौर्यात बहारचे ३२ सदस्य सहभागी झाले होते. दौर्यादरम्यान अभ्यासकांनी मेळघाटातील जैवविविधता समजून घेतली. चिखलदरा, आमझरी चौराकुंड, भीमकुंड, कीचकदरी, सेमाडोह, हरिसाल, मध्यप्रदेशातील कोकरू खामला या निसर्गरम्य स्थळांना भेट दिली. दौर्यात पहिल्या दिवशी झालेल्या अभ्याससत्रात महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष व इतिहास संशोधक डॉ. जयंत वडतकर यांनी मेळघाटचा इतिहास आणि वैशिष्ठ्ये याबाबत मार्गदर्शन केले. दुसर्या दिवशी विदर्भातील सर्वात विस्तीर्ण व प्राचीन अशा गाविलगड किल्ल्याची परिक्रमा करताना या किल्ल्याची इत्यंभूत माहिती डॉ. वडतकर यांनी बहारींना दिली. हरिसालच्या घनदाट जंगलात झालेले रानपिंगळ्याचे दर्शन अभ्यासकांना सुखावणारे होते. तर पवनचक्क्यांची शृंखला असलेल्या कोकरू खामला या जंगलव्याप्त परिसरात पर्वतीय पाकोळी हा दुर्मिळ पक्षी आढळून आल्याने सहभागी पक्षिमित्रांचा आनंद द्विगुणित झाला होता. यासोबतच भीमकुंड परिसरात चित्तथरारक साहसी खेळांचा अनुभवही बहारींनी घेतला.
मेळघाट भ्रमंती सुरू melghat study  करण्यापूर्वी सदस्यांनी ज्येष्ठ पक्षीमित्र तथा शास्त्रज्ञ डॉ. व्ही. टी. इंगोले यांच्या अमरावती मार्गावरील निसर्गाच्या सानिध्यात स्थित ग्रीन सर्कल या विज्ञानकेंद्राला भेट दिली. डॉ. इंगोले यांनी केलेले पर्यावरणपूरक प्रयोग, संशोधन व नवनिर्मिती याबाबत अभ्यासकांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली.
या अभ्यासदौर्यात बहारचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, उपाध्यक्ष दीपक गुढेकर, भारती गोमासे, सचिव दर्शन दुधाने, सहसचिव देवर्षी बोबडे, कार्यकारी सदस्य प्रा. किशोर वानखडे, अतुल शर्मा, पल्लवी पाटोडकर बोदिले, याकूब शेख यांच्यासह सुषमा शर्मा, जयंत सबाने, डॉ. आरती प्रांजळे घुसे, अमोल मुनेश्वर, मनेशकुमार सज्जन, राकेश काळे, संगीता बोबडे, मेघा गुढेकर, सुरज बोदिले, सुमित उगेमुगे, ओशिन शर्मा, विक्की लंगोटे, अंजुम शेख, संस्कृती जयस्वाल, आदी सदस्य सहभागी झाले होते.