राजकारणात खळबळ : खासदार विशाल पाटील यांना मोठा धक्का

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
सांगली
miraj panchayat samiti सांगली जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. ईश्वरपूर नगराध्यक्ष पद अपात्र ठरविण्याच्या निर्णयानंतर आता मिरज पंचायत समितीच्या काँग्रेसच्या सभापती तन्वी कमलेकर यांचे सभापतीपदही रद्द करण्यात आले आहे. अतिरिक्त विभागीय आयुक्तांनी हा निर्णय देत संबंधित पदासाठी नव्याने निवडणूक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे खासदार विशाल पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून, सांगलीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 

miraj panchayat samiti chairperson tanvi kamlekar disqualified in sangli political setback 
मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत कथित अपारदर्शकता आणि सदस्य अपहरणाच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपच्या कवलापूर पंचायत समिती सदस्य राणी भोरे यांनी यासंदर्भात अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीनंतर तन्वी कमलेकर यांचे सभापतीपद रद्द करण्याचा निर्णय देण्यात आला असून, पदासाठी फेरनिवडणूक घेण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
या निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या एका सदस्याचे अपहरण झाल्याचा आरोप समोर आला होता. या घडामोडीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार तन्वी कमलेकर यांची अवघ्या एका मताने सभापतीपदी निवड झाली होती. पंचायत समितीत बहुमत असूनही भाजपाला पराभव स्वीकारावा लागल्याने राणी भोरे यांनी निवडणूक प्रक्रियेविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीत आता कमलेकर यांचे सभापतीपद रद्द करण्यात आले आहे.याआधीही सांगलीच्या राजकारणात अशाच प्रकारची मोठी कारवाई झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनाही त्याचा राजकीय फटका बसला होता. ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांचे नगराध्यक्षपद जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी अपात्र ठरवले होते. अतिक्रमण आणि बांधकामातील कथित अनियमिततेप्रकरणी शिवसेनेचे घनश्याम उर्फ जयकुमार जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीनंतर हा निर्णय देण्यात आला होता.आता मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदाबाबत झालेल्या या निर्णयामुळे सांगलीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून, आगामी फेरनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.