मतदारसंघातील विकासकामांना गती देण्याचे आ. संजय गायकवाड यांचे निर्देश

विविध विषयांवर जिल्हा परिषदेत उच्चस्तरीय आढावा बैठक

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
बुलढाण
sanjay gaikwad बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि विकासकामांना अधिक गती देण्याच्या उद्देशाने आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद, बुलढाणा येथे आ. संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीत घरकुल योजना, अतिक्रमित जागांचे प्रश्न, आरोग्य विभागाच्या उपाययोजना, शासनाची वृक्षलागवड मोहीम तसेच मतदारसंघातील विविध विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला.
 

mla sanjay gaikwad reviews development works in buldhana assembly constituency, gives instructions to officials 
बैठकीच्या प्रारंभी विविध विभागांच्या अधिकार्‍यांनी आपल्या विभागाच्या कामकाजाचा आणि प्रलंबित विषयांचा सविस्तर आढावा सादर केला. त्यानंतर आ. संजय गायकवाड यांनी प्रत्येक विषयावर बारकाईने चर्चा करत नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा, मंजूर प्रस्ताव अनावश्यक कारणांनी प्रलंबित ठेवू नयेत, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करून द्यावीत तसेच कोणताही पात्र नागरिक शासनाच्या घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश आमदार गायकवाड यांनी दिले.
अतिक्रमित जागांच्या प्रश्नांवर चर्चा करताना त्यांनी कायदेशीर चौकटीत राहून नागरिकांना न्याय मिळेल अशा पद्धतीने कार्यवाही करावी, विकासकामांमध्ये अडथळा निर्माण करणारी प्रकरणे समन्वयाने सोडवावीत आणि सर्व संबंधित विभागांनी परस्पर सहकार्याने काम करण्याच्या सूचना दिल्या. आरोग्य विषयक उपाययोजनांवरही बैठकीत विशेष भर देण्यात आला. ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, औषधसाठा, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता तसेच विविध आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, गावोगावी स्वच्छता मोहीम, फॉगिंग, औषध फवारणी, पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी आणि जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या स्पष्ट सूचना आ. गायकवाड यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या. नागरिकांना वेळेत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. शासनाच्या वृक्षलागवड अभियानाचा आढावा घेताना प्रत्येक विभागाने दिलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे, केवळ वृक्षलागवड न करता त्यांच्या संगोपनाकडेही तितकेच लक्ष द्यावे, पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढवावा आणि ही मोहीम व्यापक जनआंदोलनाच्या स्वरूपात राबवावी, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेत निधीअभावी किंवा प्रशासकीय कारणांमुळे रखडलेल्या कामांना तातडीने मंजुरी मिळवून ती वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे आमदार गायकवाड यांनी स्पष्ट केले. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, तहसीलदार विठ्ठल कुमरे, अधीक्षक स्त्री रुग्णालय डॉ. प्रशांत पाटील,जिल्हा परिषदेचे सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंते, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.