मुंबई,
gold smuggling महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका मोठ्या आंतरराष्ट्रीय सोने तस्करी टोळीचा भंडाफाेड केला. या कारवाईदरम्यान बँकॉकहून तस्करी केलेले ७.४९ कोटी रुपये किमतीचे पाच किलोहून अधिक सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली़ आराेपींमध्ये विमानतळातील विविध दुकानांमध्ये काम करणारे तीन कर्मचारी आणि तीन फिलिपिनो नागरिकांचा समावेश आहे.
चौकशी आणि तपासादरम्यान, तस्करीची एक धक्कादायक पद्धत समोर आली आहे. तपासात असे उघड झाले आहे की, यावेळी तस्करीसाठी सोन्याची पावडर मेणामध्ये लपवली जात होती. संशय टाळण्यासाठी आरोपी मेणामध्ये लपवलेल्या सोन्याच्या पावडरने भरलेल्या या पिशव्या एकमेकांना देत होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन परदेशी नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारे वकील आफताब कुरेशी आणि प्रभाकर त्रिपाठी यांनी सांगितले की, त्यांचे पक्षकार हे फिलिपिन्सहून थायलंडला प्रवास करणारे खरे आंतरराष्ट्रीय ट्रान्झिट प्रवासी होते. त्यांचा भारतात प्रवेश करण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि त्यांनी इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण केली नव्हती.