दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

- अश्लील फोटो नातेवाइकांना पाठविल्याचा आरोप

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर
sexual assault cases शहरात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे शहरातील महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिली घटना हुडकेश्वर तर दुसरी घटना जरीपटक्यात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
 

nagpur minor girls sexual assault cases, two pocso cases registered by police 
१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचे अश्लील फोटो सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे नातेवाइकांना पाठविल्याचा आरोप असलेल्या २२ वर्षीय युवकाविरुद्ध हुदकेश्वर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संदीप संजय उमरकर (२२, विठ्ठलनगर क्रमांक १,) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची २०२४ मध्ये अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. त्यानंतर त्याने तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. आरोपीने मुलीला वारंवार आपल्या भाड्याच्या घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या कालावधीत आरोपीने अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो तिच्या संमतीशिवाय मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर त्याने आपल्या ई-मेल आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे अश्लील फोटो पीडित मुलीच्या मावशीच्या इन्स्टाग्राम आणि ई-मेल अकाउंटवर पाठविल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला. तक्रारीनंतर हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
१४ वर्षीय मुलीवर बलात्कार
जरीपटका परिसरातील आहुजा नगर येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी ३८ वर्षीय आरोपीला अटक केली. संतोष छुगानी असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या ओळखीचा होता. तो त्यांच्या घरी नेहमी येत-जात असल्याचा फायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचारानंतर आरोपीने मुलीला हा प्रकार कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. मात्र, आरोपीकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने अखेर आईला आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी संतोष छुगानी याला अटक केली.