यूपीत युतीवर ओवैसींचा मोठा संकेत

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
owaisi उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असतानाच एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर रात्रंदिवस मेहनत घेत असल्याचे सांगितले. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत आघाडीबाबत विचारले असता, आम्ही राजकीय पक्ष चालवतो, स्वयंसेवी संस्था नाही, असे सांगत त्यांनी बिहारमध्येही युतीचे आवाहन केले होते आणि उत्तर प्रदेशातही त्याच भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. जागावाटपाचा निर्णय चर्चेतून होईल, तो टीव्ही स्टुडिओमध्ये ठरत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
 
owaisi
 
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यासोबत संभाव्य आघाडीबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे ओवैसी यांनी सांगितले. मात्र भविष्यात अशा प्रकारची चर्चा झाली, तर त्याची माहिती लपवली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जिन्ना संदर्भातील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले की, आमचा मोहम्मद अली जिन्नांशी कोणताही संबंध नाही. १९४७ मध्येच त्यांच्या विचारांना आम्ही नाकारले होते. देशात हिंदुत्ववादी धोरण राबवले जात असून मदरसे आणि दर्ग्यांवर कारवाई होत आहे. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यानंतर एका विशिष्ट समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुस्लिम समाजाने स्वतःची राजकीय ताकद वाढवली नाही, तर ही परिस्थिती कायम राहील, असेही त्यांनी म्हटले. रामपूरमधील जौहर विद्यापीठाच्या मुद्द्यावर बोलताना ओवैसी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. मुस्लिम समाजाने उच्च शिक्षण घेऊन अभियंते आणि डॉक्टर व्हावे, अशी त्यांची इच्छा नाही, असा आरोप त्यांनी केला.
 
मध्य प्रदेशात लागू करण्यात आलेल्या समान नागरी संहितेवर (यूसीसी) प्रतिक्रिया देताना त्यांनी सरकारकडे आकडेवारीची मागणी केली. मुस्लिम समाजात बहुपत्नीत्वाचे प्रमाण असल्याचे दावे केले जातात, मात्र त्यासाठी ठोस सर्वेक्षण आणि आकडेवारी सादर करावी, केवळ आरोप करून चालणार नाही, असे ते म्हणाले. मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावरही ओवैसी यांनी भाजपवर अविश्वास व्यक्त केला. सत्ताधारी पक्ष कोणताही निर्णय घेऊ शकतो, त्यामुळे सर्वांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला १५ वर्षांच्या सत्तेनंतरही खासदार गमवावे लागल्याचा उल्लेख करत त्यांनी युसूफ पठाण यांच्यावरही धाडसाचा अभाव असल्याची टीका केली.
 
'एक राष्ट्र, एक निवडणूक' या प्रस्तावावर बोलताना ओवैसी म्हणाले की, भाजप कोणताही प्रस्ताव राष्ट्रीय हिताच्या नावाखाली पुढे आणू शकते. मात्र प्रश्न भाजप काय करते हा नसून, विरोधकांनी त्याला कशा पद्धतीने रोखायचे हा आहे. दरम्यान, २४ जुलै रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या मोठ्या मुस्लिम सभेत स्वतःसह अनेक प्रमुख मुस्लिम नेते सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.