चार दिवसांत धान खरेदी सुरू न झाल्यास ‘रास्ता रोको’

शेतकर्‍यांच्या न्यायासाठी किसान आघाडीचा एल्गार

    दिनांक :18-Jul-2026
Total Views |
सिरोंचा
paddy-procurement तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था, पेंटीपाका येथील धान खरेदी केंद्रात शेकडो शेतकर्‍यांचे धान अद्यापही खरेदी न झाल्याने शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पृष्ठभूमीवर किसान आघाडीने आक्रमक भूमिका घेत तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर करत चार दिवसांच्या आत धान खरेदी सुरू न झाल्यास 24 जुलै रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
 
sironcha news photo
 
paddy-procurement निवेदनानुसार, पेंटीपाका धान खरेदी केंद्रात ऑनलाईन नोंदणी केलेल्या 352 शेतकर्‍यांपैकी केवळ 216 शेतकर्‍यांचेच धान खरेदी करण्यात आले असून, तब्बल 136 शेतकरी आजही प्रतीक्षेत आहेत. वारंवार निवेदने आणि स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप किसान आघाडीने केला आहे. शेतकर्‍यांच्या घामाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेत किसान आघाडीने धान खरेदीस किमान 10 दिवसांची मुदतवाढ, तसेच 10 ते 15 हजार क्विंटलचे अतिरिक्त उद्दिष्ट मंजूर करून सर्व प्रलंबित शेतकर्‍यांचे धान तातडीने खरेदी करण्याची मागणी केली आहे.
 
paddy-procurement किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष मधुसुधन आरवेल्ली यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, शेतकर्‍यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा थांबणार नाही. पुढील चार दिवसांत धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही, तर 24 जुलै रोजी सकाळी 7 वाजतापासून पेंटीपाका बसथांबा, राष्ट्रीय महामार्ग क्र. 63 येथे मागण्या लेखी स्वरूपात मान्य होईपर्यंत बेमुदत ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, जिल्हाधिकारी, उपप्रादेशिक व्यवस्थापक (अहेरी) तसेच संबंधित पोलिस अधिकार्‍यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.
यावेळी किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष मधुसुधन आरवेल्ली यांच्यासह राजेश रंगुवार, नागेश येलीशाला, राजबापू कंबाला, विशाल रंगू, श्रीनिवास गौतम, महेश कज्जम आणि संतोष लग्गा आदी शेतकरी उपस्थित होते.