पालघर,
palghar smugglers महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याच्या विक्री आणि तस्करीविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर धडक मोहीम सुरू केल्यानंतर तस्करांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी नवनव्या युक्त्या अवलंबण्यास सुरुवात केली आहे. अशाच एका धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश पालघर जिल्ह्यात झाला असून, 'भारत सरकार' अशी पाटी आणि भाजपचा झेंडा लावलेल्या आलिशान इनोव्हा कारमधून मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे.
तलासरी पोलीस आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचण्यात आला. गुजरातच्या दिशेने येणाऱ्या एका संशयास्पद इनोव्हा कारला अडवून तपासणी करण्यात आली. झडतीदरम्यान कारमध्ये लपवून ठेवलेला सुमारे २० लाख ६० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण माल आणि वाहन ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. तपासणी नाक्यांवर संशय येऊ नये आणि वाहनाला सहज मार्ग मिळावा यासाठी कारच्या पुढील बाजूस 'भारत सरकार' अशी पाटी लावण्यात आली होती. तसेच समोरील काचेवर भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह आणि पक्षाचा झेंडा लावण्यात आला होता. या बनावाच्या आधारे अधिकृत किंवा व्हीआयपी वाहन असल्याचा आभास निर्माण करून तपासणी टाळण्याचा प्रयत्न तस्करांनी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात तलासरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तस्करीच्या संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्यासाठी तपास पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. या अवैध व्यवसायामागील सूत्रधार कोण आहेत, तसेच या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
दरम्यान, गुटखाविरोधातील कारवाईचा धडाका राज्यातील इतर भागांतही सुरू आहे. बदलापूर पश्चिमेतील बस डेपो परिसरात स्थानिक पोलिसांच्या मदतीने अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दोन पानटपऱ्यांवर छापा टाकून त्या सील केल्या. या कारवाईदरम्यान प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.palghar smugglers या भागात बेकायदेशीररीत्या गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर ही संयुक्त कारवाई करण्यात आली.
राज्यात गुटखा माफियांविरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेमुळे तस्कर नवनव्या क्लुप्त्या वापरत असले, तरी पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या समन्वित कारवाईमुळे अशा रॅकेटचा सातत्याने पर्दाफाश होत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होत आहे.